Talegaon Dabhade: मायमर मेडिकल हॉस्पिटल राज्य शासनाने ताब्यात घ्यावे : किशोर आवारे

एमपीसी न्यूज – कोविड उपचारासाठी आलेल्या महिलेकडे पैसे नसल्याने व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे मायमर हाॅस्पिटलने तिला उपचार करण्यास नकार दिला. सदर महिला सहा तास मायमर हाॅस्पिटलच्या आवारात उपचाराविना पडून होती, त्यामुळे अखेर तिचा अंत झाला, असा आरोप जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी केला. या प्रकाराच्या निषेधार्थ जनसेवा विकास समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 

मयत ज्येष्ठ महिला शेलाबाई पांडुरंग कलवडे (वय 65) ही निगडे ता. मावळ येथील होती. कोविड उपचारासाठी ती येथे आली होती. मायमर हाॅस्पिटलने तिच्याकडे पैसे नसल्याने व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे उपचार करण्यास नकार दिला, असा आरोप करीत तळेगाव जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी तातडीने दखल घेत आंदोलन  केले.

जनसेवा विकास समितीच्या वतीने मायमर हॉस्पिटलच्या आवारात आंदोलन करण्यात आले व निदर्शने करण्यात आली. सहा तास चाललेल्या आंदोलना दरम्यान मृताच्या नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला.या वेळी मोठया प्रमाणात पोलीस फाटा उपस्थित होता.

_MPC_DIR_MPU_II

 या ठिकाणी रूग्णांची पिळवणूक केली जात असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत असतानाही रूग्णांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी केली जात आहे. मायमर हाॅस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व मायमर मेडिकल हॉस्पिटल राज्य शासनाने ताब्यात घ्यावे अशी मागणी जनसेवा विकास समितीच्यावतीने यावेळी करण्यात आली.

यावेळी नगरसेवक संतोष शिंदे, नगरसेवक रोहित लांघे, नगरसेवक निखिल भगत, प्रवक्ता मिलिंद अच्युत, सुनील पवार, कल्पेश भगत, अनिल पवार, संविद पाटील, अनिल कारके, चंदन कारके व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

मायमर मेडिकल कॉलेजने केले आरोपांचे खंडन

सर्व रूग्णांवर उत्तम प्रकारे औषधोपचार चालू आहे कोविड साथीत हजारो रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात येत आहे. कुठल्याही रूग्णांची हेळसांड होत नाही, जनसेवा विकास समितीच्या वतीने करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. रेमडिसिविर एफडीएच्या नियमानुसार मिळते गरज असलेल्या रूग्णांना दिले जाते काळाबाजाराचा प्रश्नच नाही.

डाॅक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी जे कोविड रूग्णांसाठी स्वताचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्यावर अशा पद्धतीने गोंधळ घालून दहशत निर्माण करण्याच्या या पद्धतीवर आम्ही निषेध करतो. आमची विनंती आहे आरोग्य कर्मचा-यांचे अशा पद्धतीने खच्चीकरण नको.

– डाॅ. धनाजी जाधव

उपप्राचार्य, मायमर मेडिकल कॉलेज, तळेगाव दाभाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.