Yerawada : एटीएम फोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या टोळीकडून पुण्यातील 25 गुन्हे उघड

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; येरवाडा पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – एटीएम फोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या टोळीकडून पुणे, पिंपरी, येथील 25 गुन्हे उघडकीस आणण्यास येरवडा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, घातक शस्त्र आणि मोटारसायकलसह तब्बल 26 लाख 44 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सुरजीतसिंग राजपालसिंग टाक (वय 30, रा. बिराजदारनगर, हपडसर, पुणे), गोगलसिंग शामसिंग कल्याणी (वय 47, रा. रामटेकडी हडपसर, पुणे), 3)बिंतुसींग शामसींग कल्याणी (वय 23), अशी अटक आरोपींची नावे असून एका अल्पवयीन मुलालाही अटक करण्यात आली आहे. आरोपी बितुसींग कल्याणी हा 11 गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. ही कारवाई बुधवारी (दि.5) येरवडा येथील आंबेडकर सांस्कृतिक हॉल येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी लोखंडी सुरे, एक स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी कटावणी, लोखंडी बोर कटर, नायलॉन दोरी, मिरची पावडर, पेपर स्प्रे आदी घातक शस्त्र घेऊन एटीएम फोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांच्या खब-यांमार्फत मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी कार आणि मोटार सायकल असा एकूण 1 लाख 52 हजार 480 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवली.

पोलीस कोठडीत तपास करीत असताना त्यांच्याकडून येरवडा पोलीस ठाण्याअंतर्गत 8, बिबवेडी पोलीस ठाण्यांतर्गत 10, तर हडपसर, पिंपरी, चिखली, वानवडी, फरासखाना, लोणीकाळभोर आणि चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एक असे एकूण 25 गुन्हे उघडकीस आणण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 300 ग्राम चांदीचे दागिने, चार हजार 500 रुपये रोख रक्कम, एक कुलर व चार चारचाकी वाहने, पाच दुचाकी वाहने, तीन लोखंडी कोयते, मिरची पूड कटावनी, स्क्रू ड्रायव्हर पेपर स्प्रे बोअर कटर, असा ऐकून 26 लाख 44 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई, अपर पोलीस आयुक्त, पुर्व विभाग सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त परि ४ प्रसाद अक्कानवरु, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग डॉ. शिवाजी पवार, व पोलीस निरीक्षक येरवडा राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस नाईक अशोक गवळी, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे, अजय पडोळे, समीर भोरडे, पोलीस हवालदार बहिरट यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.