Vadgaon : नगरपंचायतीच्या वतीने दिव्यांगांना अपंग कल्याण निधीतून आर्थिक मदत

येत्या पाच दिवसांत प्रत्येकी ५ हजार रुपये बँक खात्यात जमा केले जाणार

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायतच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या 3 % अपंग कल्याण निधीतून शहरातील जवळपास ६० दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 5  हजार रुपये याप्रमाणे सुमारे तीन लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. येत्या पाच दिवसांत ही रक्कम खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली.

या योजनेअंतर्गत आज शनिवार (दि 25) प्रातिनिधिक स्वरूपात नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष माया चव्हाण यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना 5  हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी आरोग्य सभापती राजेंद्र कुडे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, किरण म्हाळसकर, नगरसेविका प्रमिला बाफना, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले आदी उपस्थित होते.

मुख्याधिकारी ओगले म्हणाल्या, या लाॅकडाऊनच्या कालावधीत गर्दी टाळण्यासाठी आज प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. मात्र, पुढील पाच दिवसांच्या आत सर्व दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये आरटीजीएसद्वारे जमा होणार आहेत.

तरी येणाऱ्या कालावधीत आपल्या शहरात जे कोणी दिव्यांग बांधव असतील त्यांनी वडगाव नगरपंचायत कार्यालयात संपर्क साधून आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी व या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओगले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.