Nagpur: संस्कृत भाषेच्या पुन:जागरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल

एमपीसी न्यूज – संस्कृत भाषा ही जगातील सर्व भाषांची जननी आहे. सर्व विषयांच्या ज्ञानाचे उगमस्थान असलेल्या या जगतजननीच्या पुन:जागरणासाठी  सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल तथा कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज (सोमवारी) केले.

रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे ‘ऑनलाईन संस्कृत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करताना कोश्यारी बोलत होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे माजी कुलगुरु प्रो. व्ही. कुटुंबशास्त्री, ‘संभाषण संदेश’चे संपादक डॉ. जनार्दन हेडगे, विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव प्रो. विजयकुमार यावेळी उपस्थित होते.

उद्घाटनपर भाषणात कोश्यारी म्हणाले, भारतीय साहित्यात महाकवी कालिदास यांचे महत्त्व सर्वात श्रेष्ठस्थानी आहे.  संस्कृतचे केवळ भाषा ज्ञान असणे पुरेसे नाही.  तर, या भाषेतील विविध शास्त्रांचे ज्ञानही आत्मसात करणे गरजेचे आहे. संस्कृत भाषेच्या अध्ययनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. भाषा, संस्कार, विचार, संस्कृती, कला, विज्ञान, विविध शास्त्रांचे ज्ञान या भाषेत आहे.

संस्कृत ही ‘सर्वजनभाषा’ झाली पाहिजे.  या भाषेच्या विकासासाठी धोरण आखणे गरजेचे आहे. संस्कृत भारतीसारख्या संस्था सरल संस्कृत संभाषणाचे प्रशिक्षण देतात. संभाषणाशिवाय भाषेचे अस्तित्व नसते. जीवनात संस्कृत अध्ययन व संभाषण हे व्रत म्हणून स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

विश्वविद्यालयातर्फे जानेवारी 2020 मध्ये झालेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचा शतकोत्सव आणि सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचा अहवाल ‘ए डिजिटल बुक ऑन द फिफ्टीन ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स, नागपूर’ या ग्रंथाचे प्रकाशन सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांनी देखील संस्कृत भाषेचे महत्त्व त्या काळात जाणले होते. राज्य शासनाचा संस्कृत विद्यापीठांच्या सर्व योजनांना पाठिंबा आहे. तसेच विद्यार्थी व समाजापर्यंत संस्कृत भाषा अधिकाधिक पोहचावी, यासाठी ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारा’ची थांबलेली प्रक्रिया लवकरच  सुरु करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.