Nagpur News : मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

एमपीसी न्यूज – पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती न्यायालयाने 3 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणी मंत्री ठाकूर यांच्या कारचालकासह दोन कार्यकर्तेही दोषी आहेत.

यशोमती ठाकूर, सागर सुरेश खांडेकर, शरद काशीराव जवंजाळ आणि राजू किसन इंगळे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही घटना 24 मार्च 2012 रोजी दुपारी 4.15 वाजता राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडली होती. या प्रकरणी शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी तक्रार दिली होती.

न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी 24 मार्च 2012 रोजी दुपारी काँग्रेसच्या तत्कालीन आमदार व विद्यमान मंत्री ॲड. यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही
कार्यकर्त्यांसह चुना भट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. हा प्रकार निदर्शनास आल्यावर वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवून हा एकेरी मार्ग असल्याचे सांगत त्यांना वाहन घेऊन जाण्यास मनाई केली. त्यावर यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद आणि राजू यांनी उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला.

तसेच कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी भादंविच्या कलम 353, 332, 186, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. चौकशीअंती आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने 5 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. त्यातील 1 साक्षीदार फितूर निघाला.

साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. उर्मिला जोशी (फलके) यांच्या न्यायालयाने यशोमती ठाकूर,  सागर खांडेकर, शरद जवंजाळ आणि राजू इंगळे यांना 3 महिने सश्रम कारावास, प्रत्येकी 15 हजार 500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचवेळी फितूर झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाने मंत्री यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका केली.

दरम्यान, उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली आहे. न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल. बाकी राजीनामा देण्याच्या मागणी बाबत, तर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.

आपले कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसाला सत्तेच्या मस्तीत मारहाण करणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन आमदार व राज्याच्या विद्यमान महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.