Pimpri News: परतीच्या पावसाने पवना धरण तुडुंब! दुसऱ्यांदा 100 टक्के भरले धरण, पण…

एमपीसी न्यूज – मागील दोन दिवस मुसळधार पडलेल्या परतीच्या पावसाने पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण तुडूंब भरले आहे. धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदा दुसऱ्यांदा धरण 100 टक्के भरले आहे. यामुळे पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पण, शहरवासीयांना पाणीपुरवठा दिवसाआडच राहणार आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मंगळवार, बुधवारी धरण क्षेत्रात रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांत 70 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे 9 मिली मीटर पाणी साठ्यात वाढ झाली. यामुळे धरण पुन्हा एकदा तुडुंब भरले आहे. ऑगस्टअखेर पवना धरण शंभर टक्के भरले होते. 1 जूनपासून धरण क्षेत्रात 1788 मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, 64.71 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

आजमितीला धरणात 100 टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 3914 मिली मीटर पाऊस झाला होता. तर, धरण 100 टक्के भरले होते. यंदाही धरण 100 टक्के भरले आहे. असे असले तरी, मागील 11 महिन्यापासून सुरू असलेला दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार आहे. पाणी कतापीपासून शहरवासीयांची सुटका नाही.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. आता धरण 100 टक्के भरल्यानंतरही पाणी कपात कायम राहणार आहे. वाढीव पाणी जोपर्यंत उपलब्ध होत नाही. तोपर्यंत एकदिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी म्हणाले, पवना धरण क्षेत्रात परतीचा पाऊस जोरदार पडला. दोन दिवसांत 70 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. ओले, नाले जोरात वाहू लागले. त्यामुळे धरणातील साठा वाढला. धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. ऑगस्टमध्ये धरण 100 टक्के भरले होते. आता पुन्हा गुरुवारी रात्री धरण तुडुंब भरले आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे.

पवना धरणातील पाण्याची आजची आकडेवारी!

#गेल्या 24 तासात झालेला पाऊस 09 मिली मीटर

#1 जूनपासून झालेला पाऊस 1788 मिली मीटर

#गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 3914 मिली मीटर

#धरणातील सध्याचा पाणीसाठा 100% टक्के

#गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 100% टक्के

#गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
2 टक्के मिली मीटर

#1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 64.71% टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.