Nagpur News : नागपूर ‍तिसऱ्या लाटेच्या वाटेवर, कडक निर्बंध लागणार

एमपीसी न्यूज – मागील दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात दोन आकडी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नोंदवली जात आहे. नागपूरसाठी ही धोक्याची घंटा मानली जात असून नागपूर ‍तिसऱ्या लाटेच्या वाटेवर आहे. त्यामुळे वेळीच निर्बंध लावणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नितीन राऊत यांनी कोरोनाचा आढावा घेतला. पुढील दोन-तीन दिवसात व्यापारी, उद्योजक व अनुषंगिक घटकांच्या बैठकी घेवून नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण दोन आकडी संख्येत वाढले आहेत, अशीच सुरुवात दुसऱ्या लाटेची देखील झाली होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात जिल्ह्यात झाली आहे. असे समजून उपाययोजना करण्याबाबत प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी एकमत व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची व शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, पुढील तीन दिवसांत यासंदर्भातील निर्णय घोषित करावा, अशी सूचना राऊत यांनी केली.

सध्या रात्री दहापर्यंत हॉटेल्स सुरु आहेत. त्यावेळेत कपात करण्याबाबतचे सुतोवाच या बैठकीत करण्यात आले. प्रशासनामार्फत पुढील तीन दिवसानंतर नागपूर जिल्ह्यातील निर्बंधाची घोषणा केली जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी टाळणे आवश्यक असून दोन लसी घेतलेल्या नागरिकांपासून सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात नागपुरात केवळ 145 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली तर, दोन रुग्णांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात 42 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एक रुग्ण दगावला आहे. नागपूरमध्ये सध्या 56 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.