Nagpur : सरकार पोलीस कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं; ‘त्या’ पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार 50 लाखांची आर्थिक मदत -गृहमंत्री

एमपीसी न्यूज – राज्य सरकार पोलीस कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मुंबईत दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत, सरकारी नोकरी आणि नियमानुसार मिळणारी मदत देखील मिळेल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला, त्यात ते बोलत होते.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, “महाराष्ट्र पोलीस सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन दोन पोलिसांचा मृत्यू झाला. ही बाब अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्या पोलिसांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. पोलिसांना कोरोनाबाबत कोणतीही समस्या अथवा तक्रार असल्यास त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी पोलिसांसाठी स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे.

प्रत्येक पोलिसाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य तो उपचार मिळण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर, महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील.

वाधवान प्रकरणाचा चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक होईल. रविवारी दुपारी साडेतीन वाजता सातारा पोलीस अधीक्षकांनी धीरज व कपिल वाधवान या दोघांना सीबीआयच्या ताब्यात दिले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांना होम क्वारंटाइन केले आहे. या कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी जे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिले होते, त्याबाबत नेमलेल्या अपर मुख्य सचिव मनोज सैनिक चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.

चौकशी समितीचा अहवाल रीतसर माझ्याकडे येईल आणि पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यावर योग्य तो निर्णय होईल. या अहवालात अमिताभ गुप्ता यांनी स्वतः हे पत्र मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे पत्र देण्याबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे. तसेच हा चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.