Pimpri News : विरोधकांची ‘आडवा आणि जिरवा’ची भूमिका – नामदेव ढाके

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील औंध-रावेत या बीआरटीएस रस्त्यालगतचे चेंबर रस्त्याच्या समपातळीवर करणे अशी कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. विरोधक नाहक विरोध करत आहेत. विरोधकांची विकासकामे “आडवा आणि जिरवा”ची भूमिका असून आगामी निवडणुकीत जनताच त्याना उत्तर देईल असे प्रत्युत्तर सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिले.

ढाके म्हणाले, औंध-रावेत हा बीआरटीएस रस्त्याच्या काही भागाचे काम 10 वर्षांपूर्वी तर काही भागाचे काम सुमारे 6 वर्षांपूर्वी करण्यात आलेले आहे. दरम्यान 10 वर्षापासून ते आज अखेर या रस्त्यावर विविध विकास कामांमुळे बरीच स्थित्यांतर झालेली आहेत. या रस्त्याच्या बाजुने एमएनजीएलची गॅस वाहिनी तसेच तत्सम वेगवेगळ्या युटीलीटी देण्यात आलेल्या आहेत. यामुळे या रस्त्याच्या बाजुला असलेला फुटपाथ पुर्णत: नष्ट झालेला आहे. याच रस्त्यावर औंध ते डांगे चौका दरम्यान पिंपळे निलख येथे जाण्यासाठी अंडरपास, पार्क स्ट्रीट येथे जाण्यासाठी अंडरपास, जगताप डेअरी येथील उड्डान पुल यासारखी विविध विकास कामे करण्यात आलेली आहे.

पर्यायाने ही कामे करत असताना रस्ता रुंदीकरण करणे, स्ट्रॉमलाईन टाकणे. यावरील चेंबर करणे तसेच रस्त्याचा उतार पाणी जाण्याच्या दिशेने करणे, रस्त्यालगतचे चेंबर रस्त्याच्या समपातळीवर करणे इ. कामे करणे अत्यंत आवश्यक आहे. पुणे शहराकडून औंध मार्गे पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करत असताना हा रस्ता प्रामुख्याने शहराच्या दर्शनी भागात येतो. त्यामुळे हा रस्ता शहराच्या नावलौकीकात भर टाकणारा प्रमुख मोठा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचे सुयोग्य नियोजन करुन रस्ता विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. औंध-रावेत या बीआरटीएस रस्त्याच्या विकसनाबाबत आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी डोळ्यावर पट्टी बांधुन पाहणी केली की काय? अशी दाट शक्यता वाटते, असे ढाके म्हणाले.

इलेक्शन फंडची आम्हाला गरज नाही. विकासकामे अडवून ठेवणाऱ्या आणि खोटे आरोप करणाऱ्यांनाच इलेक्शन फंडची गरज पडणार आहे. विकास कामांच्या संदर्भात “आडवा आणि जिरवा” हे कशासाठी करायचे आणि याच्या मागचा सुप्त हेतु काय? हे जनतेने ओळखलेले आहे, असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.