मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Talegaon Dabhade News : इंद्रायणी विद्यामंदिर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव ढोरे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीनंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात नामदेव सोपानराव ढोरे यांची अध्यक्षपदी व शैलजा शंकर ढोरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या अध्यक्षपदी नामदेव सोपानराव ढोरे आणि उपाध्यक्षपदी शैलजा शंकर ढोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी म्हणून आर के निखारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि 29) सकाळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ या कार्यालयात विशेष सभा झाली. अध्यक्षपदासाठी नामदेव ढोरे आणि उपाध्यक्षपदासाठी शैलजा ढोरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी निखारे यांनी दोन्ही उमेदवारांची निवड जाहीर केली. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक, मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

इंद्रायणी विद्यामंदिर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची सन 2021 ते सन 2026 या कालावधीसाठीची निवडणूक पार पडली. यामध्ये शिक्षकेतर कर्मचा-यांचे नऊ तर शिक्षकांचे दोन उमेदवार निवडून आले. यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

नामदेव ढोरे हे मावळ फेस्टिवलचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत. मावळ तालुक्यातील शैक्षणिक, सांप्रदायिक आणि सामाजिक संस्थांशी ते संबंधित आहेत. त्यांच्या निवडीमुळे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शैलजा शंकर ढोरे यांची इंद्रायणी विद्यामंदिर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी, हेमंत श्रीराम हळबे यांची सचिवपदी, किशोर नामदेव डामसे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. तर संचालकपदी अमित तानाजी गायकवाड, सुबोध संभाजी गरूड,किशोर पंढरीनाथ शेवकर, अश्विनी अविनाश गोखले, प्रतिभा उत्तम खाडप, संदीप प्रल्हाद भोसले, रविंद्र किसन बिक्कड आदींची निवड जाहीर करण्यात आली. आर के निखारे  यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. 

शिक्षकांच्या पॅनेलचा  दारुण पराभव

सन 1985 पासून आतापर्यंत या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोधात होत होती. त्यात शिक्षकेतर कर्मचा-यांचे प्रतिनिधी कमी असायचे. यावेळच्या निवडणुकीत शिक्षकेतर कर्मचा-यांनी त्यांची प्रतिनिधी संख्या वाढविण्याची मागणी केली. मात्र शिक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. शिक्षकांच्या हट्टापायी ही निवडणूक लागली आणि त्यात शिक्षकांचा सुफडा साफ झाला. आजवर शिक्षकेतर कर्मचा-यांचा एखाद दुसरा प्रतिनिधी असायचा. मात्र पहिल्याच निवडणुकीत शिक्षकेतर कर्मचा-यांनी बाजी मारली.

प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी ही निवडणूक लढवली. शिक्षकांचे 11 उमेदवार या निवडणुकीत उतरले होते. त्यातील केवळ दोन उमेदवार निवडून आले. तर शिक्षकेतर कर्मचा-यांचे 10 उमेदवार रिंगणात होते. त्यातील नऊ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत शिक्षकांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला.

निवडणुकीशी काहीही संबंध नाही – डॉ. मलघे

इंद्रायणी विद्यामंदिर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीशी आपला काहीही संबंध नाही, असा दावा प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केला आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे दोन्ही आपल्यासाठी एकसमान आहेत. पतसंस्थेच्या निवडणुकीत आपण कोणतीही भूमिका घेतली नव्हती, असे त्यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले.

Latest news
Related news