Pimpri : महापालिका विरोधी पक्षनेतेपदी नाना काटे यांची निवड

विभागीय आयुक्तांकडे केली राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी नोंदणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे आज (गुरुवारी) करण्यात आली. 36 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता पालिकेचा विरोधी पक्षनेता असणार आहे. त्यामुळे काटे पालिकेचे नवे विरोधी पक्षनेते असणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे हे पद मानाचे आहे. पहिल्यावर्षी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील योगेश बहल यांना तर दुस-या वर्षी भोसरी मतदारसंघातील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता साने यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते.

आता तिसऱ्या वर्षी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली आहे. काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.