Pune News : सामाजिक ऐक्य तोडण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

एमपीसी न्यूज – देशातील सामाजिक ऐक्य तोडू पाहणाऱ्या शक्ती अलिकडे डोके वर काढू पाहत आहेत पण हे प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याचे बिशप थॉमस डाबरे यांच्या सत्कारानिमित्त बोलताना काढले.

बिशप थॉमस डाबरे यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बिशप हाऊस येथे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने गुलाबपुष्पाचा गुच्छ भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल, नगरसेवक अविनाश बागवे, माजी महापौर कमलताई व्यवहारे, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे आदी उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्व जातीधर्माचे योगदान आहे आणि ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात जराही सहभाग नव्हता अशा नागपूर केंद्रीत व्यवस्थेतून अल्पसंख्यांकांना त्रास दिला जात आहे.परंतु, डॉक्टर आंबेडकर यांचे संविधान मानणाऱ्या आपल्या सारख्यांनी शांततेच्या मार्गाने विरोध करीत पुढे चालायचे आहे, असे आवाहन नाना पटोले यांनी यावेळी केले.

बिशप थॉमस डाबरे यांच्या कार्याला यंदा पन्नास वर्षे पूर्ण झाली, असे सांगून प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, पुण्याचे वातावरण शांत आणि सामाजिक सलोख्याचे ठेवण्यात बिशप डाबरे यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.

प्रभू येशू यांचा बंधूभावाचा संदेश बिशप डाबरे यांनी समाजात प्रामाणिकपणे रुजविला, असे गौरवोद गार माजी आमदार उल्हास पवार यांनी काढले.

सर्व जाती धर्माच्या लोकांनी देश घडविला हे योगदान मान्य करायला हवे, असे बिशप थॉमस डाबरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. अलिकडे निधर्मी तत्वाला बाधा आणणाऱ्या शक्ती प्रबळ होताना दिसतात याबद्दल बिशप डाबरे यांनी खेद व्यक्त केला. लोकांच्या भल्यासाठी झटणे हे राजकारणी माणसाचे कर्तव्य आहे, त्याचे पालन व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला.

काँग्रेस पक्षाने सर्व धर्म जाती संस्कृती एकत्र राहाव्यात यासाठी सातत्य ठेवले, असेही ते म्हणाले. दरम्यान, पुणे शहर निधर्मी आहे, असे बिशप डाबरे यांनी सांगितले. मी मराठी असून मराठी भाषेचा मला अभिमान आहे, मराठी माणसाविषयी प्रेम आहे, असे उत्कटपणे बिशप डाबरे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.