Pune : मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍या हस्‍ते नाना वाड्याचे पुनरुज्जीवन

एमपीसी न्यूज – पुण्यनगरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम “स्वराज्य” या क्रांतिकारकांच्या संग्रहालयात झाल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पेशवेकालीन नानावाड्याचे पुनरुज्जीवन व “स्वराज्य” क्रांतिकारक संग्रहालयाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, जगदीश मुळीक, महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाना वाड्याचे पुनरुज्जीवन करून महापौर आणि नगरसेवक यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे. पुण्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंची कमी नाही. आपल्या देशाला 5000 वर्षांची संस्कृती आहे. आपण आपल्या देशाचा इतिहास जतन केला पाहिजे. नाना वाड्यातील संग्रहालय ‘इतिहासाचं चालते बोलते पुस्तक’ असून या ठिकाणी दैदिप्यमान इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पुणे महापालिकेच्या वतीने अशा पद्धतीने होणाऱ्या कामास राज्य सरकार पूर्ण मदत करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या बद्दलही मुख्‍यमंत्र्यांनी महापालिकेचे कौतुक केले.

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही थोडक्‍यात आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. मी विद्यार्थी आहे, असे नम्रपणे नमूद करुन देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी हाल-अपेष्‍टा सहन करणा-या एका तरी क्रांतीकारकाचे चरित्र पूर्णपणे वाचावे, असे आवाहन केले. ‘मुक्‍या मनाने किती उधळावे शब्‍दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढचे तोफांचे चौघडे’ या काव्‍यातून समर्पकपणे आपल्‍या भावना मांडल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.