Pune News : ‘आरएसएस’च्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालकपदी नानासाहेब जाधव

एमपीसी न्यूज : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक म्हणून सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. प्रांत प्रचारप्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी ही निवड घोषित केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दर तीन वर्षांनी जिल्ह्यापासून वरील सर्व स्तरावरील संघचालक पद व अखिल भारतीय सहकार्यवाह यांच्या निवडणुका होत असतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने हि बैठक घेण्यात आली. बैठकीत नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील निर्वाचित संघशाखा प्रतिनिधींनी हि निवड केली.

नानासाहेब जाधव हे मूळ बेलापूर (श्रीरामपूर) येथील रहिवासी असून सध्या नगर येथे स्थायिक आहेत. त्यांनी कृषी अभियांत्रिकी मधील एम.टेक.पदवी प्राप्त केलेली असून माती आणि पाणी संवर्धनासाठी त्यांचा विशेष अभ्यास आहे.

राहुरी  येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते 1983 ते 2012 या काळात प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. पदवी परीक्षा प्राप्त केल्यावर संघाचे पूर्णवेळ प्रचारक  म्हणून मावळ, शिरूर तालुका तसेच जळगाव जिल्हा स्तरावर सहा वर्ष काम केले आहे. यापूर्वी रा. स्व. संघाच्या जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असून 2013 पासून प्रांत संघचालक पदावर ते कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.