Nigdi : नंदकिशोर कल्चरल सोसायटीचा बहारदार कथक नृत्य कार्यक्रम

एमपीसी  न्यूज – नामवंत नृत्यसंस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने नुकताच नंदकिशोर सभागृह यमुना नगर निगडी येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्त कथक नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. सकाळी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली. त्यानंतर गुरुपूजन झाले. प्रारंभी डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांनी आपले गुरू पं. बिरजू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी गुरू डॉ. कपोते यांचे पारंपरिक पद्धतीने गुरूपूजन केले. या सोहळ्यास संस्थेचे आजी माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. यानंतर सायंकाळी कथक नृत्याचा अप्रतिम कार्यक्रम सादर झाला. 

प्रथम विद्यार्थ्यांनी गुरुवंदना सादर करून त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांनी हस्तसंचलनाचे सौंदर्यपूर्ण रीतीने प्रदर्शन केले. या नंतर तीन वर्षे शिकलेल्या विद्यार्थ्यांनी सुरेख असे ताल त्रितालमध्ये तोडे व तुकडे सादर केले चार वर्षे शिकलेल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सहजतेने ताल झपतालात आमद, तोडे, परण व तिहाई सादर केली. जुन्या विद्यार्थ्यांनी तिनतालमध्ये गतनिकास, राधाकृष्ण छेडछाड गतभाव, कवित्त, लडी लीलया सादर केली. या कार्यक्रमात एकूण १०० विद्यार्थ्यांनी विविध नृत्ये सादर केलीं कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः नृत्यरचना तयार करून त्या आपले गुरू डॉ नंदकिशोर कपोते यांना गुरुदक्षिणेच्या स्वरुपात अर्पण केल्या. यानंतर स्वतः डॉ कपोते यांनी अप्रतिम कथक नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांनी कृष्ण भजन सादर करून आपले अभिनय कौशल्य प्रदर्शित केले. तबल्याच्या सोबत हारजित, घुंगरू तबला जुगलबंदी व एका घुंगराचा आवाज काढून रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘ठुमक चलत रामचंद्र’ हे रामभजन सादर करून रामाच्या बाललीला सादर केल्या.

या कार्यक्रमात भावना सामंत, किरण जावा, प्रज्ञा शिंदे, फरगी पटेल, आनंदिता, समृद्धी कुलकर्णी, समर्थ ठाकरे यासह १०० विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमास महाराष्ट्र पोलीस संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, शिवसेनेच्या गटनेत्या नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका सुमन पवळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास साथसंगत संतोष साळवे, यश कांबळे, मिलिंद दलाल व अक्षय येंदे  यांनी केली. कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून भरभरून दाद दिली. त्यामुळे सर्व कार्यक्रम बहारदार झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.