Daund News : नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्राचा 41 व्या सत्राचा दीक्षांत संचालन समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज – नानवीज दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा सत्र क्रमांक ४१ चा दीक्षांत संचलन समारंभ गुरुवारी (दि. 14) पार पडला. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संदीप आटोळे यांनी प्रशिक्षणाबाबतच्या अहवालाचे वाचन केले. समारंभासाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाचचे समादेशक तानाजी चिखले, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संग्राम डांगे, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे शाखा अभियंता संजय गित्ते, शौर्य अकॅडमीचे छात्र उपस्थित होते.

कार्यक्रमात सत्र क्रमांक 41 मधील स्मृतींना उजाळा देणारी ‘स्मृतिगंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्रशिक्षणार्थींचे संचलन, पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे राबविलेले विविध उपक्रम, व्हर्च्युअल क्लासरूम, आयईडी पार्क, मॉडेल पोलीस स्टेशन, ट्राफिक पार्कचे आधुनिकीकरण, नव्याने शिकविण्यात आलेले भावनिक प्रज्ञावंत पोलीस याबरोबरच रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी उपक्रमांबाबत प्राचार्य संदीप आटोळे आणि त्यांच्या सहका-यांचे प्रमुख पाहुणे कृष्ण प्रकाश यांनी कौतुक केले.

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज येथे कृतिशील प्रयोगाच्या माध्यमातून तयार झालेला अष्टपैलू पोलीस कर्तव्यनिष्ठेने समाजाचे रक्षण करून महाराष्ट्र पोलीस दलाची शान नक्कीच उंचावेल व पोलिसांचे सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला साजेसे वर्तन ठेवेल असा विश्वास देखील कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.

अष्टपैलू प्रथम म्हणून विशाल जगताप (बीड), अष्टपैलू द्वितीय शाम माने (नांदेड), आंतरवर्ग प्रथम आकाश बिराजदार (लातूर), गोळीबार प्रथम क्रमांक महादेव गोयकर (जळगाव), बेस्ट टर्न आऊट सौरभ कोलते (जळगाव), उत्कृष्ठ खेळाडू सुनील यादव (गोंदिया) या प्रशिक्षणार्थींना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रशिक्षण सत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावणारे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षण केंद्राला सहाय्य करणा-या शासनाच्या अन्य विभागाच्या अधिका-यांचा देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उप प्राचार्य एच पी मुलाणी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.