Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक वॉरंट नंतर महाराष्ट्रात कुठे काय घडले?

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात महाड, नाशिक आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक आणि पुण्यातून मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती सकाळी पोलिसांनी दिली. या घटनेनंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत तर काही ठिकाणी आक्रमक आंदोलन देखील करण्यात आली.

माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही – नारायण राणे
नारायण राणे यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. नारायण राणे म्हणाले, ‘माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का?,’ अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन असा इशारा यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला. ‘पोलिसांची तत्परता आदेशामुळे आहे. आमचं पण सरकार वरती आहे. हे कुठपर्यंत उडी मारतात पाहूयात.’ जन आशीर्वाद यात्रा वेळापत्रकाप्रमाणे जाणार असल्याचंही यावेळी नारायण राणे यांनी सांगितलं.

मुंबईत नारायण राणेंच्या घराबाहेर भाजप आणि युवा सेनेचे कार्यकर्ते भिडले
नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आला. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले आहेत. युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक समोर आल्याने जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर धडक देत आंदोलन सुरु केलं आहे.

पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवर दगडफेक, भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या
पुण्यातल्या आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी दगडफेक केली असून त्यात या मॉलचं बरंच नुकसान झालं आहे. तर भाजप कार्यालयात आणि गुडलक चौकात शिवसेनेने कोंबड्या सोडल्या.

नाशिक, चिपळूण, सांगली, औरंगाबाद, मुंबईमध्ये शिवसैनिक आक्रमक
दरम्यान, नाशिकसह चिपळूण, सांगली, औरंगाबाद, मुंबईमध्ये देखील शिवसैनिकांची आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. चिपळूणमध्ये भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं आहे. राणे यांची जन आशीर्वाद चिपळूणमध्ये आल्यानंतर आता भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी आक्रमकता दिसून आली आहे. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील पाहायला मिळाली. राणेंच्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच बहादूर शेख नाका परिसरात हा सर्व प्रकार सुरु असताना पाहायला मिळल आहे. दरम्यान, दोन्ही बाजूला कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राजकीय सुडापोटी अटक वॉरंट -चंद्रकांत पाटील
‘हत्या आणि बलात्कार असे भयंकर गुन्हे असणाऱ्या आरोपींना राज्य सरकार अटक करत नाही, मात्र एका वाक्यावरून केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक केवळ राजकीय सूडापोटीच होत आहे. भाजपचा कोकणातील वाढता जनाधार रोखण्याचा हा प्रयत्न आहे.’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांच्या एका वाक्यावरून टोक गाठून त्यांना अटक होईल इतका देशाचा कायदा कमकुवत नाही. राज्यात शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकणात भाजपचा जनाधार वाढत आहे, या राजकीय भीतीपोटी हे सगळे सुरु आहे. परंतु यामुळे जनआशीर्वाद यात्रा रद्द होणार नसल्याचे पाटील म्हणाले.

आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनीही भाषणं केली आहेत. दसरा मेळाव्याची भाषणं काढून पाहा. त्यात वादग्रस्त विधानं आहेत. नीलम गोऱ्हे सभापती असूनही राजकीय वक्तव्यं करतात. त्यांना विचारा की, सभापतीपदाचा राजीनामा दिलाय का? त्यामुळे सामंजस्याने मार्ग काढायला हवा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान – राष्ट्रवादी
नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अपमान झाला नसून हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. असं मंत्री व राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. असेच मत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

राणे यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करा – विनायक राऊतांचे नरेंद्र मोदी यांना पत्र
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही – विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस
‘राणेसाहेबांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करतंय ते बघता आम्ही राणेसाहेबांच्या मागे ठाम उभे आहोत’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘बोलण्याच्या भरात कदाचित राणे साहेब ते बोलले असतील, ते वापरायचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. तथापि मुख्यमंत्री हे एक महत्त्वाचे पद आहे, त्या पदाबद्दल बोलत असतांना संयम बाळगणे आवश्यक आहे, असं माझं मत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्री विसरतात, यामुळे कोणच्या मनात संताप होऊ शकतो, तो वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो’ असं फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.