Narayangaon : महिलेला ‘म्हैस’ म्हटल्यावरून दोन कुटुंबांमध्ये राडा; परस्परविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एक महिला शेजारी राहणा-या महिलेला ‘जाडी’ आणि ‘म्हैस’ असे म्हणाली. यावरून दोन कुटुंबांमध्ये राडा झाला. याबाबत परस्परविरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

नासिम पीरमोहम्मद इनामदार (वय 30, रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • नासिम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी रात्री नासिम वडगाव कांदळी येथे आरोपींच्या घरासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी आरोपी महिलेने त्यांना ‘जाडी’ आणि ‘म्हैस’ म्हणून हाक दिली. त्याचा नासिम यांनी जाब विचारला असता आरोपी महिलेने आणि तिच्या नातेवाईकांनी मिळून नासिम यांच्या आईला आणि जावेला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच नासिम यांची कपडे फाडली. या भांडणात नासिम यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने पडून गहाळ झाले.

याच्या परस्परविरोधात रिजवाना हमीद इनामदार (वय 40, रा. वडगाव कांदळी, ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • रिजवाना यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी ‘म्हैस’ का म्हणालात? यावरून रिजवाना, त्यांचे पती, मुलगी आणि मुलाला लाथा बुक्क्यांनी घरात घुसून मारहाण केली. यामध्ये रिजवाना यांची मुलगी जखमी झाली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायणगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.