Narendra Modi: नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी नागरिकांना शासनातर्फे दरमहा मोफत धान्य – पंतप्रधान

पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लढाईत सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये कोणीही उपाशी झोपता कामा नये, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला दिवाळी, छठपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी नागरिकांना दरमहा शासनातर्फे मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी ही घोषणा केली.

येणारा काळ सणासुदीचा आहे. या काळात खर्चही वाढतो. त्यामुळे गेले तीन महिने सुरू असलेली पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवाळी, छठपूजेपर्यंत सुरु राहणार असल्याची मोठी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहिला नाही पाहिजे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरमहा पाच किलो गहू अथवा पाच किलो तांदूळ तसेच एक किलो हरभरा देण्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारात 90 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. यामध्ये मागील तीन महिन्यांचा खर्च जोडला तर हा खर्च दीड लाख कोटींच्या घरात जातो, असे मोदी यांनी सांगितले.

या देशातील प्रामाणिक करदात्यांना त्यांनी या निमित्ताने विशेष धन्यवाद दिले. प्रामाणिकपणे कर भरल्यामुळेच गरीबांपर्यंत हे मोफत अन्न धान्य पुरविणे शक्य होत आहे, असे ते म्हणाले.

आता संपूर्ण भारतासाठी एक रेशनकार्डचीही व्यवस्था केली जात आहे. म्हणजेच ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ असणार आहे. वन नेशन वन रेशन कार्डचा सर्वात मोठा फायदा गरीब लोकांना होईल, जे  पोटापाण्यासाठी आपलं गाव सोडून इतरत्र नोकरीसाठी जातात, असे ते म्हणाले.

देशात अनलॉक-2 लागू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पावसाळा आला असल्याने स्वतःची काळजी घेण्याचं आवाहनही पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन नागरिकांनी योग्य पद्धतीने केल्याने भारतात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला. राज्य सरकार, देशातील नागरिक आणि संस्थांनी अशाच प्रकारची सतर्कता बाळगणं गरजेचं आहे, असे त्यांनी देशवासीयांना बजावले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. नियमांचं पालन करणाऱ्यांना समजावलं पाहिजे. अनलॉक-1 मध्ये काही प्रमाणात निष्काळजीपणा वाढताना दिलसा आहे, ही बाब चिंताजनक आहे. देशाचा पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक सर्वांना नियम एकसारखे आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गेल्या तीन महिन्यांत 20 कोटी गरीब कुटुंबाच्या जनधन खात्यात 31 हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. या काळात 9 हजाराहून अधिक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी जमा झाले आहेत. या कोरोना संकटात गोरगरीब व वंचितांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने पूर्ण व्यवस्था केली आहे, असा दावा पंतप्रधानांनी यावेळी केला.

ऐका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले संपूर्ण भाषण….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.