Pune : ‘नासा’चे पार्कर सोलर प्रोब यान घेणार सूर्याकडे झेप ! (व्हिडिओ)

सूर्य मोहिमेबाबत खगोल अभ्यासिका लीना बोकील यांच्याशी विशेष वार्तालाप 

एमपीसी न्यूज- जागतिक अवकाश संशोधनाच्या विश्वात आज फार मोठी क्रांती घडणार आहे. प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने  सूर्यावरच झेप घेण्याची मोहीम आखली आहे.  त्यासाठी ‘नासा’ने पार्कर सोलर प्रोब नावाचे यान तयार केले असून त्याचे उड्डाण भारतीय प्रमाणवेळेनुसार आज, (रविवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास होणार आहे. नेमकी ही मोहीम आहे तरी काय ? या सूर्य मोहिमेची फलनिष्पत्ती काय असणार आहे ? या मोहिमेबाबत सर्वसामान्य खगोलप्रेमींना पडणाऱ्या प्रश्नांना पुण्यातील खगोल अभ्यासिका लीना बोकील यांनी एमपीसी न्यूजच्या प्रतिनिधीशी केलेल्या विशेष मुलाखतीमध्ये अतिशय सोप्या भाषेत उत्तरे दिली आहेत. 

हे मानवनिर्मित यान दुसऱ्या यानांच्या तुलनेत सूर्याच्या सातपट अधिक जवळ जाणार आहे. या यानातून सूर्याच्या पार्श्‍वभूमीचा अभ्यास केला जाणार आहे. ‘इजीन पार्कर’ या 90 वर्षीय खगोलशास्त्रज्ञाने सौर वादळांसंदर्भात सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या यानाला ‘पार्कर सोलर प्रोब’ असं नाव देण्यात आले असून अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मिशन म्हणून याकडे पहिले जात आहे. वास्तविक हे उड्डाण शनिवारी (दि. 11) होणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे नासाला हे उड्डाण पुढे ढकलावे लागले.

सूर्याच्या बाहेरी आवरण म्हणजे सूर्याचा करोना हा त्याच्या पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का असतो ? यामधून कोणत्या प्रकारच्या ऊर्जाचा प्रवाह असतो ? त्यातील भौतिक, रासायनिक बदल कसे होत असतात ? यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्‍नांची उकल करण्याचा प्रयत्न हे यान करणार आहे. सूर्याच्या करोनामधून सौर वादळाची उत्पत्ती होते. त्यामुळे या मिशनला अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मिशन मानलं जातंय.

सूर्याचा अभ्यास करणारे आणि खगोलशास्त्रावर संशोधन करणाऱ्या जगभरातील व्यक्तींना ‘नासा’ने आमंत्रित केले होते. त्यामध्ये लीना बोकील यांचा समावेश होता. आज सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या ‘पार्कर सोलर प्रोब’ यानाच्या मायक्रोचिपवर टाकण्यात आलेल्या अनेक संशोधकांच्या नावामध्ये लीना बोकील यांचेही नाव आहे  ही पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

लीना बोकील या खगोल अभ्यासक असून त्या ‘नासा’ हनीवेल स्पेस एज्युकेटर म्हणून काम करतात. पाच ते सहा वेळा ‘नासा’ सेंटरला जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतले असून अटलांटिस स्पेस शटलचे उड्डाण त्यांनी प्रत्यक्ष पहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.