Nashik: ऑनलाईन ‘रमी गेम’मध्ये तरुणाने उडवले वडिलांचे तब्बल साडेदहा लाख रुपये
Nashik: A young man stole Rs 10 lakh from his father bank account and spend on an online rummy game अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन गंडा घातल्याचा केला बनाव, सायबर सेलच्या तपासात फिर्यादी तरुणाचे फुटले बिंग!
एमपीसी न्यूज – अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन गंडा घातल्याचा बनाव करीत खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या मुलाचे बिंग नाशिक पोलिसांच्या सायबर सेलमुळे फुटले. या तरुणाने अडीच महिन्यांमध्ये वडिलांच्या खात्यातील 10 लाख 64 हजार रुपये ऑनलाईन रमीमध्ये उडविल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.
या घटनेने तरुणाच्या कुटुंबीयांना धक्का तर बसलाच शिवाय पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. कुटुंबीयांच्या विनंतीनुसार समज देऊन मुलाला सोडून देण्यात आले. मात्र या निमित्ताने ऑनलाईन गेम्सच्या नावाखाली सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या लुटीचा विषय ऐरणीवर आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सर्वजणच घरी होते. त्यामुळे स्वाभाविकपणे या कालावधीत मोबाइल इंटरनेटचा वापर वाढला. त्यामुळे ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे देखील घडले. काही तरुण फसव्या ऑनलाईन गेमच्या जाळ्यात अडकले. जिथे लॉकडाऊनच्या काळत हाताला रोजगार नव्हता. त्यामुळे काही नागरिक एक एक पैसा कमीविण्यासाठीही आटापिटा करत होते. त्याच काळात नाशिकच्या एका पित्याच्या बँक खात्यातील तब्बल 10 लाख 64 हजार रुपये लंपास झाले.
नाशिकमधील एका व्यक्तीला जमिनीच्या व्यवहारातून पैसे मिळाले होते. तेच पैसे गेल्याने त्यांच्या पाया खालची वाळू सरकली. आठ मार्च ते 25 मार्च या कालावधीत त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 10 लाख 64 हजार रुपये कमी झाले. 23 मार्चपासून लॉकडाऊनमुळे सारे व्यवहार ठप्प होते. त्यामुळे या कालावधीत बँकेच्या खात्यातून पैसे गायब कसे झाले, हा प्रश्न होता. अखेर त्यांच्या 24 वर्षीय मुलाने नाशिक पोलिसांच्या सायबर सेल कार्यालयात जाऊन अज्ञात व्यक्तीने ऑनलाइन गंडा घातल्याची तक्रार दाखल केली.
या घटनेत अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन पैसे काढल्याचे म्हटले होते. मोठी रक्कम असल्याने या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात आली. सायबर पोलिसांच्या तांत्रिक विभागाने या प्रकरणाची सखोल माहिती काढली. त्यावेळी पोलिसांनाही मोठा धक्का बसला. त्याचे कारणही तसेच होते. फिर्याद तरुणाने स्वतःच ऑनलाइन रमी खेळामध्ये हे पैसे उडविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
फिर्यादी तरुणाच्या मोबाईल फोनमध्ये दोन-तीन रमी खेळाची अॅप्लिकेशन आढळून आली. मुलाचा मोबाईल फोन क्रमांक वडिलांच्या बँक खात्याला लिंक असल्याने खेळात गमवलेली रक्कम ही वडिलांच्या बँक खात्यातून कापली जात होती. त्यामुळे मुलाच्या ऑनलाईन रमी खेळाच्या वेडापायी वडिलांना मनस्ताप आणि मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले.
नाशिक पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांची टीम तपास करत असताना त्यांची तपासाची दिशा आता ऑनलाईन फसव्या गेमकडे वळाली आहे. ऑनलाइन अॅप्लिकेशन कोणते खरे कोणते खोटे, कोण कायदेशीर आणि कोण बेकयदेशीर काम करत आहे याकडे पोलिसांनी लक्ष वेधल आहे.
दोन अडीच महिन्यात साडेदहा लाख रुपयांचा एका व्यक्तीला भुर्दंड बसत असेल तर ऑनलाईन गेम खेळणाऱ्याची संख्या लक्षात घेता ही उलाढाल कोट्यवधी रुपयांची असल्याने त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. यात जो दोषी आढळेल त्यावर कारवाई केली जाणार आहे. ऑनलाइन गेम अनेकांचा आकर्षित करत असतात. मात्र, या जाळ्यात अडकण्याआधी प्रत्येकाने त्याबाबत माहिती आणि खबरदारी घेतली पाहिजे. पालकांनीही आपला मुलगा काय करतोय, याबाबत लक्ष दिले तर असे प्रकार टाळता येऊ शकतील, असे पौर्णिमा चौघुले यांनी म्हणाल्या.