Nashik News : महापालिका  निवडणुकीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार : संजय राऊत

 महापौेर शिवसेनेचाच होणार 

एमपीसीन्यूज  : नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी सुरु झाली असून मागील वेळेसच आम्हाला भाजपचा करेक्ट कार्यक्रम करायचा होता, पण तो आम्ही टाळला. आमचं ठरलयं, पुढिल निवडणुकीत लोकशाही मार्गाने वाजत गाजत विजय मिळवत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकावयचा असे सांगत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा शिवसेना नेते तेथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी दिला.

नाशिक दौर्‍यावर आले असता शनिवारी (दि.२०) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत घेत राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. महापालिका निवडणुकीची रणनिती ठरविण्याबाबत स्थानिक सहा नेत्यांची कोअर टिम तयार केली जाणार असून ते सर्व निर्णय घेतील.

भाजपकडून महापालिकेत लूट चालू असल्याचा आरोप करत रोज दरोडे पडत असून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काय चालू आहे? या बाबतची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल व ते याबाबत योग्य पावले उचलतील, असा सूचक इशारा त्यांनी भाजपला  दिला.

जळगावमध्ये घोडाबाजार झाला याबाबत विचारणा केली असता भाजपने या अगोदर घोडेबाजार केला नाही  का,  असा सवाल उपस्थित करत पहाटेची घेतलेली शपथ हा घोडे बाजार नाही  तर काय गाढव   बाजार होता का, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

नगरसेवक अपात्र ठरवले जातील असे बोलले जात असले तरी तसे होणार नाही, असा दावाही  त्यांनी केला. गिरिश महाजन यांनी मागील आठवडयात संजय राऊत फक्त गर्जना करतात, या  टीकेला उत्तर देतांना गिरिश महाजन जळगावात कुठे पडले जरा शोधा, अशा  शब्दात राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर  दिले. गिरिश महाजनांना विचारा दीड वर्षापुर्वी आम्ही जी गर्जना केली होती म्हणून ते आता घरी बसले, असा पलटवारही  त्यांनी केला.

सीआयए व केबीजीला आणा 

हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास केंद्राने एनआयकडे देणे चुकीचे असून महाराष्ट्र पोलिस त्यासाठी  समर्थ आहेत. अतिशय घाईने हा तपास एनआयएकडे देण्यात आला. हा तपास अमेरिकेच्या सीआयएकडे द्या किंवा रशियाच्या केबीजीकडे द्या सरकारला काही  फरक पडत नाही. केंद्रात वेगळ्या पक्षाचे सरकार असल्याने महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचे काम सुरु असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

बंगालमध्ये देशाचे महाभारत सुरु

रामायण नाटकातील रामासह रावणानेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तेथील लोक त्यांच्याशी किती जुळतील माहित नाही. पण पश्चिम बंगालच्या भुमीवर देशाचे महाभारत सुरु आहे. एका स्त्रिला हरविण्यासाठी संपूर्ण देशाची यंत्रणा कामाला लावली आहे. या युध्दात आम्ही ममता बॅनर्जी सोबत असून त्याच विजयी होणार असा दावा  राऊत यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.