Nashik News : रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून रक्तदान शिबिर व चालकांची आरोग्य तपासणी

कोरोना काळात सेवा देणारे चालक हेच खरे कोरोना योद्धा - उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात तुमच्या आमच्या घरापर्यंत अत्यावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी अहोरात्र सेवा बाजवणारे चालक हेच खरे कोरोना योद्धा असल्याचे प्रतिपादन नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे यांनी केले.

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर याच कार्यक्रमात घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मुठाळ, लायन्स सुप्रीमचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, सतीश कोठारी, अनिल सारडा, दिलीपसिंग बेनिवाल, पी.एम.सैनी, एम.पी.मित्तल, सुनील बुरड, जे.पी.जाधव, सुभाष जांगडा, जयपाल शर्मा शंकरराव धनावडे, जे.पी.इंदोरीया, संजय राठी, महेंद्र राजपूत, सतीश कलंत्री, बजरंग शर्मा, सुरेश शर्मा, दीपक ढिकले, विशाल पाठक, बापू ताकाटे, सुनील जांगडा, तेजपाल सिंग सोडा, सदाशिव पवार, सिद्धेश्वर साळुंके आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना विनय आहिरे पुढे म्हणाले की, चालक हा वाहतूक व्यवसायाचा कणा आहे. हे चालक सुरक्षित व आरोग्यदायी राहण्यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेला कार्यक्रम स्तुत्य असा उपक्रम आहे. अपघात रोखण्यासाठी चालकांची भूमिका तितकीच महत्वाची आहे. चालकांनी योग्य खबरदारी घेतली तर अपघातांची संख्या ही नक्कीच कमी होऊ शकते. त्यामुळे चालकांनी कुठलही व्यसन करून तसेच अतिवेगाने वाहने न चालविता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

ते म्हणाले की, रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून विविध सोयीसुविधा व उपाययोजना केल्या जातात. याची दखल घेऊन नाशिक परिवहन विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली असून यापुढील काळातही नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रस्ता सुरक्षा अभियानात सर्वांचा सहभाग महत्वाचा असून सामुहिक प्रयत्न केल्यास अपघातावर नियंत्रण शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या कामकाजाची माहिती अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे.पी. जाधव, सूत्रसंचालन शंकरराव धनावडे तर आभार अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले.

रक्तदान शिबिराचे आयोजन
अपघात झाल्यानंतर अनेक रुग्णांचा रक्त पुरवठ्याअभावी जीव जातो. त्यामुळे रक्तदानाची जनजागृती होण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चालकांसाठी नेत्र, एड्ससह आरोग्य तपासणी शिबिर
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चालकांच्या डोळ्यांची तपासणी, एड्स आजाराबाबत तपासणी तसेच इतर आजाराबाबत आरोग्य तपासणी करत. चालकांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आल्या.

नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्टच्या वतीने शहरातील सर्व सिग्नलवर वाहतूक नियमांचे फलक
नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांच्या सहकार्यातून रस्ता सुरक्षा अभियाना निमित्ताने नाशिक शहरातील सर्व सिग्नलवर वाहतूक नियमांची जनजागृती होण्यासाठी फलक लावण्यात येणार आहे. या फलकांचे अनावरण नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.