Nashik News : सुजाण नागरिक म्हणून नायलॉन मांजावर बहिष्कार टाका – जिल्हाधिकारी सूरज मांढरे

ध्वनीचित्रफीतीद्वारे जिल्हाधिकारी यांचे नागरिकांना आवाहन

एमपीसीन्यूज : पतंगाच्या खेळाचा आनंद घेताना पक्षी व नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे देखील महत्वाचे असल्याने पतंगासाठी नायलॉन मांजाचा वापर करणे टाळून सुजाण नागरिक म्हणून सर्वांनी नायलॉन मांजावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ध्वनीचित्रफीतीद्वारे केले आहे.

पर्यावरण व पशूपक्षांच्या रक्षणासाठी तसेच सामान्य नागरिकांना नायलॉन मांज्यामुळे होणाऱ्या इजा व दुखापती टाळण्याच्या दृष्टिने नायलॉन मांजाचा वापर करण्यात येवू नये, यासाठी शासनामार्फत 2016 मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा 1986 च्या कलम 5 प्रमाणे या नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्री, साठवणूक व वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

यांनतर देखील प्रशासनामार्फत वेळोवेळी 144 नियमांतर्गत जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

यानुसार प्रशासन व पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून कडक कार्यवाही करण्यात येत असते. परंतू, जनहित व स्व:हितासाठी नियमांचे पालन आणि अनुसरण प्रत्येक नागरिकांने करणे आवश्यक आहे.

ज्याप्रमाणे प्रत्येक कायद्याची व नियमांची अंमलबजावणी करणे हे प्रशासन व पोलिस यंत्रणेची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे कायद्याची व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे हे देखील अत्यंत महत्वाचे आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले.

प्रत्येक खेळामध्ये हार जीत अशी स्पर्धा सुरूच असते. त्याचप्रमाणे पतंगाच्या खेळातील काटाकाटीचा आनंद घेताना पशुपक्षी व इतर नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, यासाठी नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर करू नये.

तसेच नायलॉन मांजामुळे इतरांसोबत घडलेली दुर्घटना आपल्यासोबत देखील घडू शकते या जाणीवेतून नागरिकांनी नायलॉन मांजाच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.