Nashik News : दत्तक नाशिकला केंद्राचा न्याय; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी देशातील पहिला टायर बेस्ड मेट्रो प्रकल्प

एमपीसी न्यूज – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रुपयांची तरतूद करीत असल्याची घोषणा केली आहे .

या घोषणेमुळे मेट्रोचे नाशिकचे स्वप्न पूर्ण होणार आहे . या प्रकल्पाचे सामान्य नाशिककरांनी स्वागत केले आहे . सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि ही व्यवस्था सक्षम करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . त्यात नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रुपयांच्या तरतुदीचा समावेश आहे.

नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकाळात ‘ग्रेटर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्कालीन मेट्रो रेल कार्पोरेशन आणि शहरी विकास मंत्रालयाकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता मात्र युपीए सरकार देशातील सर्वच शहरात मेट्रो प्रकल्पाबाबत सकारात्मक नव्हते. माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिक मेट्रोबरोबरच ओझर, सिन्नर, इगतपूरी, त्र्यंबकेश्वर याठिकाणी अर्ध्या तासात पोहचता यावे आणि नाशिक परिक्षेत्राचा परिसराचा विकास व्हावा यासाठी परिसरातील तालुक्यांना जोडणारी रॅपिड रेलची संकल्पना ही सादर केली होती.

सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करून हवाई सेवा, रेल्वेसह मेट्रो, सिटी बस सेवेला प्रोत्साहन देण्याचं धोरण आखले आहे. यासाठी 18 हजार कोटी रुपयेची तरतूद केली आहे. मेट्रो लाईट आणण्यासाठी भर दिला जाणार आहे. कोच्ची, बंगळुरु, चेन्नई, नागपूर, नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्पाला प्रोत्साहन देणार असून नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूद केली असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. यामुळे नाशिकच्या उद्योग, व्यापार व बांधकाम क्षेत्रालाही चालना मिळेल असे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सांगितले. या घोषणेचे पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी स्वागत केले आहे. आमदार देवयानी फरांदे, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी मेट्रो प्रकल्पामुळे नाशिकच्या विकासात मोठा हातभार लागणार असल्याचे सांगितले .

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची योजना केली होती. विरोधी पक्षांकडून दत्तक नाशिकला काय मिळालं असे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी चे नेते विचारत होते. नुकतेच नाशिक दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देशाला मॉडेल ठरणारा टायरबेस मेट्रोचा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारकडून विशेषतः शिवसेनेकडून अडवून ठेवल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, मी मुख्यमंत्री असताना जगातील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून नाशिकमध्ये मेट्रो निओचा प्रकल्प साकार करण्याचा निर्णय घेतला होता . मात्र , दुर्दैवाने त्यात राजकारण होत आहे . प्रकल्पातील त्रुटींच्या पुर्ततेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे फाईल पाठविण्यात आली आहे . मात्र , गेल्या आठ महिन्यांपासून फाईल लालफितीत बंद करून ठेवण्यात आली आहे .

राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवून प्रकल्पाला चालना देण्याची मागणी करताना प्रकल्प साकार झाल्यास नाशिक आंतरराष्ट्रीय शहर होईल असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता . शहराच्या विकासात राजकारण आणण्याची वृत्ती बदलणे गरजेचे असल्याचे सांगताना महाविकास आघाडी सरकारकडून नाशिकच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.