Nashik News : साहित्य संमेलनासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे समिती गठीत

एमपीसी न्यूज – शहरात मार्च महिण्याच्या अखेरीस 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून या संमेलनासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता राहणार आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तालय स्तरावरुन सल्लागार समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीत प्रत्येक विभागाचा एक सदस्य राहणार आहे.

समितीच्या नोडल अधिकारीपदी सहायक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे यांची निवड झाली आहे तसेच येत्या शुक्रवारपर्यंत (दि. 5) संबंधित विभागांनी त्यांच्या सदस्यांची माहिती पोलिसांनी मागवली आहे.

नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीदरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, साहित्य संमेलन निर्विघ्नपणे व शांततेत पार पडण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांना समन्वय बैठकीचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाण्डेय यांनी सल्लागार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, कामगार कल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन या विभागांकडील प्रत्येकी 1-1 प्रतिनिधी तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडळाचे 2 सदस्य राहणार असून त्यात एक महिला सदस्य आवश्यक असेल.

हे असेल समितीचे कार्य
संमेलनासाठी कार्यक्रमांना परवानगी देणे, मिरवणूक, प्रभातफेरी इतर कार्यक्रमांना परवानगी देणे, पार्किंग व्यवस्था आदींसाठी विविध विभागांची परवानगी आवश्यक राहणार आहे. त्यामुळे सल्लागार समितीच्या मार्फत या परवानग्या किंवा मंजुरी देणे सोपे होणार आहे. या समितीची बैठक आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा होणार असून त्यात संमेलनाची रुपरेषा, आढावा घेतला जाणार आहे. ही समिती साहित्य संमेलनानंतर तक्रारींचा निपटारा होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त महिनाभर कार्यरत राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.