Nashik News : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढून देशाची प्रतिमा विदेशात मलिन करण्याचा प्रयत्न करू नये – माजी सैनिकाचे आवाहन

एमपीसी न्यूज – नाशिक येथील माजी सैनिक आणि कारगिल कमांडो सेक्युरिटी सर्व्हिसेसचे संचालक राजेंद्र कट्यारसिंह बागूल यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते चौधरी राकेश टिकैत यांना खरमरीत शब्दात खुले पत्र लिहिले असून आपल्या राजकारणासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची अब्रू विदेशात घालवू नये असे आवाहन केले आहे.

आपल्या पत्राची सुरुवात बागूल यांनी ‘जय जवान, जय किसान’ अशी केली असून आपण लष्करातून निवृत्त होऊन देवळाली कॅम्प ला रहात असलो तरी जामनेर येथील शेतकरी असल्याचे नमूद केले आहे. चौधरी राकेश टिकैत यांना उद्देशून लिहिलेल्या आपल्या पत्रात माजी सैनिक राजेंद्र बागूल यांनी टिकैत यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर आपल्याला पडलेले प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आपल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असे आमचे आवाहन आहे असे ते पत्राच्या अखेरच्या टप्प्यात म्हणतात. पत्राचा मजकूर पुढील प्रमाणे.

श्री. चौधरी राकेश टिकैतजी,
महोदय,

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर 26 नोव्हेंबर पासून आपल्या नेतृत्वाखाली काही शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बाजार आणि व्यापाऱ्यांच्या नोंदणीबाबतच्या शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्याची तयारी दाखवली आहे. तरी ही संयुक्त किसान मोर्चा तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीबाबत ठाम आहेत.

आम्ही शेतकरी आणि माजी सैनिक गेली काही महिने मोदी सरकारचे शेती विषयक धोरणं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी संयुक्त किसान संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आलेले दोन राज्यातील शेतकरी आंदोलन पहाता सदर आंदोलन शेतकरी नेत्यांनी आपले राजकीय अस्तित्व दिसण्यासाठी करत असल्याचा आमचा समज झाला आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढून देशाची अब्रू जागतिक स्तरावर घालवण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या नावाखाली कुणी करु नये असे आमचे माजी सैनिकांचे कळकळीचे आवाहन आहे. हे आंदोलन येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत चालवण्याचा इरादा आपला नुकताच वृत्तपत्रातील बातमी वाचून आम्हाला दिसून येतोय. राजकारणासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असे आमचे आवाहन आहे.

आंदोलनाची पार्श्वभूमी :

या आंदोलनाबाबत संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते चौधरी राकेश टिकैत म्हणतात, केंद्रातील विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. (याचा अर्थ आपण विरोधी पक्षाची उणीव भरून काढू इच्छिता का.)

आमच्या आंदोलनात सुमारे 550 संघटना आहेत. यापैकी एकही संघटना माघार घेणार नाही. 2024 पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे. (म्हणजे पुढील लोकसभा निवडणुकी पर्यंत सरकार विरोधी वातावरण निर्मिती साठी या आंदोलनाचा वापर का) किमान हमी भावाचा कायदा व्हावा, तसेच कृषी कायदे रद्द करावेत अशी आमची मागणी आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, पण न्यायालयाने नेमलेल्या समितीतील सर्व लोक कायदे समर्थक आहेत. (असे म्हणणे म्हणजे न्यायालयीन यंत्रणेवर अविश्वास दाखविण्या सारखे आहे ) म्हणून समिती सदस्यांच्या नियुक्तीशी आम्ही चर्चा आणि वाटाघाटी करणार नाहीत. मे 2024 पर्यंत दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाची तयारी आहे. देशात नवे कृषी कायदे येण्यापूर्वीच गोदामे उभारण्यात आली आहेत. (देशांत गोदामाची कमतरता असल्यामुळे होणारी अन्न धान्याची नासाडी टळावी यासाठी सरकारचे ग्रामीण भागात गोदामे उभारण्यास प्रोत्साहन आहे, त्या दिशेने पावले उचलली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला यामुळे भाव मिळणार असताना ही पोट दुखी कशामुळे?)

तीन कृषी कायदे मागे घेण्यात यावेत आणि किमान आधारभूत मूल्याची कायदेशीर हमी देण्यात यावी.

यावर कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी ‘कापणी झाल्यानंतर शेतातील अवशेष जाळण्याचे प्रकार तसेच विजेबाबत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे’ जाहीर केले आहे.

केंद्रीय कृषीमंत्री म्हणतात, केंद्र सरकारने केलेला कायदा संपूर्ण देशासाठी आहे. बहुतांश शेतकरी, तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि शेती क्षेत्रात काम करणार्‍या लोकांनी या कायद्याला मान्यता दिली आहे. शेतकरी आंदोलन कर्त्यांच्या कृषी कायदे रद्द करण्याची मागणी वगळता इतर पर्यायांवर गंभीरपणे आणि खुल्या दिलाने विचार करण्यास सरकार तयार आहे. आम्ही पून्हा आवाहन करतो की, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढून देशाची अब्रू जागतिक स्तरावर घालवण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या नावाखाली कुणी करू नये असे आमचे माजी सैनिकांचे कळकळीचे आवाहन आहे.

हे आंदोलन येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत चालवण्याचा इरादा राकेश टिकैत यांचा दिसून येतोय. त्यांनी राजकारणासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असे आमचे आवाहन आहे.

https://g.page/Kargilsecurity?share

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.