Nashik News : संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्ट वर प्रशासकीय समितीची निवड

धर्मादाय सहआयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध वारकरी सेवा समिती जाणार न्यायालयात

एमपीसी न्यूज – संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानच्या विश्वस्तपदासाठी पुन्हा अर्ज मागविले आणि तोपर्यंत धर्मादाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांनी चार फिट पर्सन्स सदस्यांची अर्थात प्रशासकीय समिती नेमली आहे संस्थानच्या कायदेशीर विश्वस्तांची नियुक्ती होईपावेतो ही समिती कारभार पाहणार असून आगामी यात्रोत्सवाचे नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

संत निवृत्तिनाथांचा यात्रोत्सव 7 व 8 फेब्रुवारी रोजी होत असल्याने या निमित्ताने नियोजन करण्यासाठी फिट पर्सन्सची नियुक्ती करण्यात आली आहे. या आदेशानुसार सहायक धर्मादाय आयुक्त के. एम. सोनवणे, अॅड. भाऊसाहेब गंभीरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव आणि त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक रणदिवे यांना संस्थानच्या कारभाराची जबाबदारी दिली आहे. त्यांनी यात्रेचे नियोजन करावयाचे असून संस्थानचा कारभारही नवीन विश्वस्त नियुक्ती होईपावेतो पहायचा आहे.

वरिष्ठ न्यायालयात वारकरी समिती धाव घेणार
संत निवृत्तिनाथ देवस्थान हे सकल वारकऱ्यांचे आद्यपीठ आणि भक्तिपीठ आहे. कोणताही वारकरी बाह्य घटक संस्थांवर गेल्यास त्यास नवीन निवड प्रक्रिया जबाबदार धरण्यात येईल, एक महिना अगोदर घेतलेल्या मुलाखती ग्राह्य धरण्यात याव्यात. नवीन कोणतेही मुलाखत प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, यासाठी सकल वारकरी वरिष्ठ न्यायालयात जाणार आहेत.

अगोदरच जुन्या विश्वस्त मंडळींचे चौकशी सुरू आहे. ती अजूनही पूर्ण नाही त्यातच नव्याने मुलाखती देणाऱ्या उमेदवारांना हेतुपुरस्सर डावलण्यात आले आहे हे उघड आहे. राजकारण झाल्यास संस्थान विश्वस्त बरखास्त करू असा इशारा सकल वारकऱ्यांच्या वतीने वारकरी सेवा समिती नाशिकचे अध्यक्ष अमर ठोंबरे, बाळासाहेब काकड, राजेंद्र भांड, लहाणू पाटील पेखळे, श्रावण महाराज अहिरे, दत्तू पाटील आदींनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.