Nashik News : साहित्य संमेलनात ग्रंथ प्रकाशनासाठी विनामूल्य व्यवस्था

एमपीसी न्यूज – नाशिकमध्ये 26 ते 28 मार्चदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपल्या साहित्य विषयक पुस्तकाचे, ग्रंथांचे प्रकाशन मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते व्हावे अशी अनेक लेखकांची / लेखिकांची ईच्छा असणे स्वाभाविक आहे. गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या नगरी मध्ये स्वतंत्र अशी साहित्य प्रकाशनार्थ व्यवस्था केली जाते. त्यानुसार कुसुमाग्रज नगरीमध्येही एका स्वतंत्र साहित्य प्रकाशन कट्ट्याची सर्वसमावेशक अशी व्यवस्था केलेली आहे.

या ठिकाणी आकर्षक असे व्यासपीठ असणार आहे. प्रकाशन समारंभाच्या दृष्टिकोनातून तेथे आवश्यक ती ध्वनी व प्रकाश व्यवस्था, व्यासपीठावर टेबल-खुर्च्या हे असणार आहे. शिवाय रसिक वाचकांच्या दृष्टीने खुर्च्यांची सुयोग्य बैठक व्यवस्थाही असणार आहे. अशा ठिकाणी लेखकाला आपल्या पुस्तकाचे, ग्रंथाचे प्रकाशन करण्याची सर्व व्यवस्था असणार आहे.

संबंधित व्यक्ती अथवा प्रकाशन संस्थेने जर आधी कल्पना दिली तर संमेलनाच्या निमित्ताने आलेल्या मान्यवर व प्रथितयश साहित्यिकांशी बोलूनही त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील. त्याच प्रमाणे जे पुस्तक अथवा ग्रंथ असे प्रकाशित होतील त्याची विक्री व्यवस्था ज्या प्रकाशन संस्थेने ते पुस्तक प्रकाशन केले असेल आणि त्यांचा ग्रंथ नगरीत स्टॉल असेल तर तेथे विक्रीच्या दृष्टीनेही ते ठेवण्याबाबतची विनंती संबंधितांस करून विक्री व्यवस्थेसाठी सहकार्य होईल.

विनामूल्य प्रकाशन व्यवस्था
अशा पद्धतीने प्रकाशन करणाऱ्या व्यक्तीकडुन अथवा संस्थेकडून रुपये 1000 अशी रक्कम घ्यावी अशी एक सूचना आलेली होती. तथापि, एकूणच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि साहित्याचाही अधिकाधिक प्रसार व्हावा या दृष्टीने कोणतेही मूल्य न आकारता अशी प्रकाशन कट्ट्याच्या माध्यमातून व्यवस्था होणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

कृपया साहित्यिकांनी, नवोदित लेखकांनी, संबंधित प्रकाशन संस्थांनी याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ, कार्याध्यक्ष हेमंत टकले, निमंत्रक आणि प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, सह कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, कार्यवाह प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, सुभाष पाटील तसेच ग्रंथ प्रकाशन समिती समन्वयक भगवान हिरे, समिती प्रमुख प्रा. डॉ. राहुल पाटील, समिती उपप्रमुख विश्वास देवकर व विजयकुमार मिठे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.