Nashik News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तीन फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्यात

एमपीसी न्यूज – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी फेब्रुवारी महिन्यात नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते सुरगाणा तालुक्यातील बोरमाळ तसेच सटाणा येथे भेट देणार आहेत.  

राज्यपाल कोश्यारी हे तीन फेब्रुवारीला नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. डिसेंबर- जानेवारीतच त्यांचा दौरा निश्चित झाला होता; परंतु ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तो स्थगित करण्यात आला.  तीन फेब्रुवारीला राज्यपाल सुरगाणा तालुक्यातील बोरमाळ येथे भेट देणार आहेत.

बोरमाळ येथे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. या माध्यमातून परिसरातील महिला, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, बचत गटातील सदस्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

व्यापाऱ्यांकडून होणारी अडवणूक थांबली असून टाळेबंदीच्या काळात नवा रोजगार मिळाल्याने येथील अर्थचक्र  सक्रिय राहिले. तसेच राज्यातील पहिले गुलाबी गाव अशीही या गावाची ओळख आहे.

या गावात मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी घराच्या भिंती गुलाबी रंगाने रंगविल्या आहेत. तसेच या ठिकाणी देशी गोशाळा सुरू करण्यात आली आहे. या गोशाळेत परिसरातील बचत गटाच्या महिला, मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या ठिकाणी गाईंचे शेण, गोमूत्र यापासून 19 प्रकारची औषधे तयार करण्यात येत आहेत. याशिवाय गवरी किंवा अन्य सामान तयार करण्यात येत असून त्या ठिकाणाहून त्याचे विपणन होत आहे.

राज्यपाल आपल्या दौऱ्यात या दोन्ही केंद्रांना भेट देणार असून त्यानंतर सटाणा येथील देवमामलेदार संस्थानला भेट देणार आहेत. त्या ठिकाणी देवमामलेदार यशवंतराव महाराज स्मारकाचे भूमीपूजन राज्यपालांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.