Nashik News : शक्य झाल्यास मी ट्रम्प यांच्यासोबत फोनवर बोलणार : आठवले

ट्रम्प यांनी पराभव स्वीकारुन बायडेन यांना सहकार्य करावे; आठवलेंचा सल्ला

एमपीसीन्यूज : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तथा रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसद भवनात घुसून गदारोळ केला आहे. लोकशाहीमध्ये या गोष्टीची किंमत काहीच नाही. शक्य झाल्यास आपण डोनाल्ड ट्रम्प यांसोबत फोनवर चर्चा करू; परंतु तूर्तास तरी त्यांनी पराभव स्वीकारून बायडेन यांना सहकार्य करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

ते आज नाशिक दौऱ्यावर असताना बोलत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव न स्विकारता जनमताचा अनादर करत रिपब्लिकन पक्षाचा अवमान केला आहे. हा लोकशाहीचा अवमान आहे.

त्यांच्यामुळे भारतातही आमची नाचक्की होत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी पराभव स्वीकारून नवनियुक्त अध्यक्ष बायडेन यांना सहकार्य करावे, असा असा सल्ला आठवले यांनी नाशिक येथे बोलताना दिला.

अमेरिकेत संसदेत झालेल्या हिंसाचार प्रकरणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. आठवले पुढे म्हणाले, माझ्या पक्षाचे म्हणजे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील जनमताचा कौल अमान्य करून रिपब्लिकन संकल्पनेचा, लोकशाहीचा अपमान केला आहे.

या कृतीमुळे अमेरिकेत लोकशाही धोक्यात आली आहे का, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो.

रिपब्लिकन पक्षाने असे वागणे योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा पक्ष स्थापन केला. प्रजासत्ताक म्हणजे लोकांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून त्यांनी पक्षाला हे नाव दिले. हेच नाव अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षालाही देण्यात आले.

त्यामुळे लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून ट्रम्प यांनी बायडेन यांना पदाची सुत्र सोपवणे आवश्यक होते. ट्रम्प यांनी याउलट कृती करून स्वतःबरोबर आमचीही प्रतिमा मलिन करून घेतली आहे.

ट्रम्प यांनी केलेला प्रकार लोकशाहीला मारक आहे. अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही असे आजवर जगात कोणत्याही देशात घेडले नाही ते ट्रम्प करत आहेत.

त्यामुळे आता ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा आणि नवनियुक्ती अध्यक्ष जो बायडेन यांना सहकार्य करावे. शक्य झाल्यास मी ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करेन, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.