Nashik News : नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा : कृषी मंत्री दादाजी भुसे

0

एमपीसी न्यूज – गुरुवार 18 फेब्रुवारी रोजी वादळी वारा, गारपीट व अवकाळी पावसामुळे बागलाण तालुक्यातील 15 गावांमध्ये 2 हजार 728 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये कांदा, गहू, हरभरा इत्यादी पिकांचा समावेश असून नुकसान झालेल्या सर्व पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घेत राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी बागलाण तालुक्यातील तहाराबाद, रावेर, अंतापुर व अंबासन आदी गावांची पिक नुकसानीची पाहणी केली. त्यांचे समवेत बागलानचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, तहसीलदार जितेंद्र इंगळे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, गट विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, सुभाष नंदन व परिसरातील शेतकरी व कृषी विभागासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेवून शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे, नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला देण्यात आले असून सर्व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर झालेल्या नुकसानीचा अहवाल मंत्रीमंडळात सादर करण्यात येईल व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तर अंतापूर येथील सुगी शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देवून कंपनीने केलेल्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.