Nashik News: झडप दाम्पत्याला बोर्डिंग पास देत नाशिक-बेळगांव विमानसेवेचा प्रारंभ 

एमपीसी न्यूज – केंद्राच्या ‘उडान’ अर्थात ‘उडे देश का आम नागरिक’ योजनेतून सुरु होत असलेल्या नाशिक- बेळगांव विमानसेवेचा (Nashik-Belgaum Flight) प्रवासी (बोर्डिंग) पास सामान्य अर्थात आम नागरिक असलेल्या राधाकृष्ण झडप व सुमन झडप या दाम्पत्याला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या हस्ते खासदार डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) आणि खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्या उपस्थितीत देऊन या विमानसेवेचे उदघाटन संपन्न झाले.

यावेळी एचएएल (HAL) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शेषगिरी राव, सामान्य व्यवस्थापक ए. बी. प्रधान, दीपक सिंघल, दिंडोरी प्रांत अधिकारी संदीप आहेर, स्टार एअर कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक सी. ए. बोपन्ना, उद्योजक मनीष रावल उपस्थित होते.

राज्य सरकारने उभारलेल्या नाशिक विमानतळावरुन आतापर्यंत हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद, नवी दिल्ली, बंगळुरू या शहरांसोबत आजपासून  बेळगांव शहरासाठी ही विमान सेवा सुरु झाली आहे. यामुळे नाशिककरांना कोल्हापूर आणि गोवा ही शहरे आता केवळ तीन तासांवर आली आहेत.

नाशिकमधील वाढत्या विमानसेवेमुळे नाशिक जिल्ह्यातील उद्योग व पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.

डॉ. भारती पवार यांनी  उडान योजनेमुळे नाशिक विमानतळावर विमानांची रेलचेल सुरू झाल्यामुळे मोदी सरकारची केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामधील नागरिकांसाठी उपलब्धी असल्याचे सांगितले.

डॉ पवार म्हणाल्या, सन 2016 ला सुरू झालेल्या या योजनेमुळे आतापर्यंत केंद्राकडे सुमारे 766 नवीन रूट मंजुरीसाठी प्रस्ताव आले आहेत. त्या पैकी व्यवहार्य प्रस्तावांना टप्प्या टप्प्याने मंजुरी मिळत असते.

विमानातील 50% जागा अडीच हजाराच्या आतील तिकीट दरात उपलब्ध करून देण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. तसेच देशातील लहान मोठ्या जास्तीत जास्त शहरांची कनेक्टिव्हिटी नागरिकांना मिळावी यासाठी हेलिकॉप्टर आणि सी प्लेन चा सुद्धा केंद्र सरकार वापर करीत असल्याचेही खा. डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

नाशिकमधील वाढत्या विमानसेवेमुळे जिल्ह्यातील उद्योग व पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ते म्हणाले की, नाशिक- बेळगांव विमान सुरु होणे हे जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. कारण या विमानसेवेमुळे स्वतःच्या वाहनापेक्षाही कमी खर्चात व कमी वेळेत प्रवाशांना बेळगांवला जाणे सोयीस्कर व आरामदायी होणार आहे.

तसेच नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल मराठी साहित्य संमेलनास देशभरातून येणाऱ्या साहित्यिकांना देखील या विमानसेवेचा लाभ होणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी स्टार एअर कार्यालयाचे, चेक इन काऊंटरचे उद्घाटनही करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.