Nashik News : नाशिक महापालिकेच्या कर्मचारी आकृतिबंध मंजुरीसाठी पालकमंत्र्यांना साकडे

महापौर सतीश कुलकर्णी यांची माहिती

एमपीसीन्यूज : नाशिक महानगरपालिकेत सद्यस्थितीत अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे अनेक विभागांच्या कामामध्ये अडथळा येत असून घरपट्टी, पाणीपट्टी तसेच विविध कर विभाग या विभागातील कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त तसेच काहींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या विभागात उद्दिष्टापेक्षा कमी प्रमाणात महापालिकेला महसूल मिळत आहे .  या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कर्मचारी आकृतिबंध मंजुरीसाठी पालकमंत्र्यांना साकडे घालण्यात आल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली.

याचबरोबर नाशिक महानगरपालिकेच्या इतर विभागांमध्ये ही कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक कमी होत असल्याने त्यांच्याही कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने एकंदरीत नाशिक महानगरपालिकेच्या जवळपास साडे सात हजार कर्मचाऱ्यांपैकी आज मितीस 4900 च्या आसपास कर्मचारी उपलब्ध आहेत.

उर्वरित अडीच हजाराच्या आसपास कर्मचारी हे सेवानिवृत्त व मयत झालेले असल्याने त्यांची कमतरता भासत असून इतर कर्मचाऱ्यांवर जादा कामाचा अतिरिक्त कार्यभार येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नाशिक महानगरपालिकेने राज्य शासनाकडे कर्मचारी आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवलेला असून त्यास बराच कालावधी लोटला आहे.

त्यास अद्यापपर्यंत मंजुरी न मिळाल्याने कर्मचारी भरती प्रक्रिया हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही, असे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सांगितले. त्या कारणाने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची शनिवार, दि. 30 समक्ष भेट घेऊन चर्चा केली व निवेदनही देण्यात आले.

त्यावेळी नासिक महानगरपालिकेचे सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजपा गटनेते जगदीश पाटील तसेच डॉ. कैलास कमोद व शैलेश जुन्नरे हे उपस्थित होते.

कर्मचारी भरती बाबत तसेच आकृतीबंध मंजुरीबाबत लवकरच मुंबईमध्ये संबंधित नगर विकास मंत्र्यांशी चर्चा करून आकृतीबंध मंजुरीस तसेच कर्मचारी भरती प्रक्रियेस तातडीने चालना देणे बाबत लवकरच चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

त्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी लक्ष घातल्याने आकृतीबंध मंजुरी व नोकर भरतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.