Nashik News : प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास कुणीही अधिकारापासून वंचित राहणार नाही : जिल्हा न्यायाधीश ए.एस.गांधी

मुंगसे येथे कायदेविषयक जाणीव जागृती शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज – सर्वांसाठी न्याय व न्याय आपल्या दारी ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास कुणीही आपल्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. तळागातील नागरिकांमध्ये शासकीय योजनांची जाणीव जागृती झाल्यास आयोजित शिबिराचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा वर्ग-1 चे न्यायाधीश ए.एस.गांधी यांनी आज केले.

गरिबी निर्मूलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तालुक्यातील मुंगसे येथे तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व तालुका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबीरात न्यायाधीश श्री.गांधी बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश-2 डी. डी. कुरूलकर, जिल्हा न्यायाधीश-3 डी.वाय.गौड, सहदिवाणी न्यायाधीश एस.जी.लांडगे, वाय.पी.पुजारी, एन.एन.धेंड, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर.के.बच्छाव, सचिव ॲड. किशोर त्रिभुवन, चैतन्य जाधव, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, कृषी अधिकारी भास्कर जाधव, किरण शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुका प्रशासनामार्फत चांगले काम सुरू असल्याचे सांगताना न्यायाधीश गांधी म्हणाले, तालुका विधी सेवा समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सर्व नागरिकांचा सक्रीय सहभाग अपेक्षीत आहे. आपल्या न्याय हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरण समितीची स्थापना झाली असून या माध्यमातून कुणीही न्याय हक्कापासून वंचित राहणार नाही हेच उद्धीष्ट समोर ठेवून समितीचे कामकाज सुरू आहे. ज्या नागरिकांना काही अडचणी असतील त्यांनी थेट समितीकडे दाद मागावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नागरिकांना सेवा देणे हा त्यांचा अधिकार : विजयानंद शर्मा
नागरिकांना सर्व सेवा देणे हा त्यांचा हक्क आणि अधिकार आहे, आणि आपल्या न्याय हक्काची जाणीव जागृतीसाठी राबविण्यात आलेला उपक्रम अभिनंदनीय असून या उपक्रमास शुभेच्छा देताना महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती सांगतांना प्रांताधिकारी शर्मा म्‍हणाले, शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे ही वेळेत प्राप्त करून घेतल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. महसूली कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी व सुचनांचे स्वागत असल्याचे सांगत, त्यांनी यावेळी उपस्थितांना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, शिधा पत्रिकेसह आवश्यक दाखल्यांचे प्रातिनीधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वाटप केले.

शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी स्वतंत्र कक्ष : गोकुळ अहिरे
सर्व शासकीय योजनांचा लाभ एका छताखाली देतांना शासकीय योजना आपल्या दारी ही संकल्पना वंचितांना प्रवाहात आणण्यासाठी प्रवाही ठरेल, असा विश्वास व्यक्त करताना तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे म्हणाले, शेतकरी राजाच्या सन्मानासाठी कृषी मंत्र्यांनी स्वतंत्र शेतकरी सन्मान कक्षाची स्थापना प्रत्येक कृषी कार्यालयात केली आहे. शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करतांना महाडिबीटी पोर्टलव्दारे एकाच अर्जाने विविध योजनांचा लाभ यापुढे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये संबंधित गावाच्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या फलकाचे वितरण करण्यात येत असून यावेळी मुंगसे गावाच्या फलकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर वैयक्तीक जमीन आरोग्य प्रत्रिकेचे वितरणही लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पंचायत समितीचे 11 विभाग नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत : जितेंद्र देवरे
नागरिकांच्या सेवेसाठी पंचायत समिती मार्फत विविध प्रकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगतांना गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे म्हणाले, 11 विभागांमार्फत नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याचे कामकाज पंचायत समितीमार्फत अविरत सुरू असते. यात आरोग्य, महिला बालकल्याण, शिक्षण, घरकुल योजना, वैयक्तीक लाभाच्या योजनांसह महिला बचत गट कार्यान्वित असल्याचे सांगतांना या सर्व विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांची तपशिलवार माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

सुरवातील सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. कायदेविषयक शिबिराच्या आयोजनाचा उद्देश वकील संघाचे अध्यक्ष ॲड.आर.के.बच्छाव यांनी प्रस्तावनेतून स्पष्ट केला. तर कुणीही न्याय हक्कापासून वंचित राहणार नाही यासाठी विधी सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे. गरिबी निर्मूलनासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विधी सेवा समितीची असल्याने न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून आज मुंगसे गावात आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद अभिनंदनास पात्र असल्याची भावना सहदिवाणी न्यायाधिश श्री.पुजारी व श्री.धेंड यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. सुनिल बच्छाव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.