Nashik News : देवळालीगावच्या खातेदारांना बजावलेली नोटीस नियमानुसारच : तहसीलदार अनिल दौंडे
एमपीसीन्यूज : गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये व वर्तमानपत्रामध्ये देवळालीगाव व परीसरातील खातेदारांना नाशिकच्या तहसीलदारांनी अवाजवी व अनावश्यक नोटीस दिल्याबाबत बातम्या प्रसिद्ध व प्रसारित झाल्या आहेत, या बजावलेल्या नोटीस नियमाप्रमाणेच असून बाजारमूल्याच्या 25 टक्के अधिमूल्य खातेदारांनी भरून पुढील विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ करून घ्यावी, असे आवाहन नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी केले आहे.
यासंदर्भात तहसीलदार दौंडे यांनी प्रसारमाध्यमांसाठी दिलेल्या शासकीय खुलाशात म्हटले आहे की, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत 7 सप्टेंबर 2017 रोजी जारी केलेल्या सुधारणा अधिनियम 2017 नुसार शासनाने जाहीर केल्यानुसार, 15 सप्टेंबर 1965 ते 6 सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये प्रमाणभुत क्षेत्र ( 20 आर ) पेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा हस्तांतराने किंवा वाटपाने झाल्यास तो त्या क्षेत्राच्या बाजारमूल्याच्या 25 टक्के रक्कम अधिमूल्य म्हणून भरुन नियमित करता येतो.
त्यानुसार देवळाली गाव व परिसारातील तुकडे जोड तुकडेबंदी कायद्यानुसार ना-विकास विभाग ( ग्रीन झोन ) यामध्ये असलेल्या क्षेत्रात तुकडा पडलेला असेल व सदरचे क्षेत्र सध्या विकास विभागात ( यलो झोन ) असल्याने एकूण बाजारमूल्याच्या 25% अधिमूल्याची रक्कम भरुन नियमित करता येईल.
वर्तमानपत्रे व प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातमीतील देवळाली गावातील ग. नं. 201 चे खातेदारांचे क्षेत्र हे 18 आर आहे. सदरचा तुकडा वाटपाने सन 2002 रोजी पडलेला आहे. त्यामुळे सदर क्षेत्राचे बाजारमुल्य रक्कम 98 लाख 28 हजार रुपये असल्याने नियमानुसार त्याचे 25 टक्के अधिमूल्याची रक्कम रूपये 24 लाख 57 हजार भरल्यास तो तुकडा नियमित करता करण्यात येईल.
याबाबत दिलेल्या नोटीस शासन नियमानुसारच आहेत. नोटीस दिलेल्या खातेदारांनी सदर सुधारणा अधिनियमानुसार बाजारमूल्याच्या 25 टक्के अधिमूल्याची रक्कम भरल्यास सदरचे तुकडे नियमित होतील व त्यामुळे खातेदारांना आपल्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही, अशा प्रकारच्या नियमितीकरणामुळे त्यांची पुढील विकासाची प्रक्रिया सुलभ होईल, असेही नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी आपल्या खुलाशात नमूद केले आहे.