Nashik News : आता पोस्टाद्वारे होणार पार्सलचे वाटप; जीपीओ मध्ये स्वतंत्र यंत्रणा

एमपीसी न्यूज – भारतीय टपाल विभागाने खासगी कुरिअर सेवेच्या धर्तीवर पार्सलचे वाटप करण्यासाठी जीपीओमध्ये स्वतंत्र विभाग सुरु केला आहे. टपाल कार्यालयात नोडल डिलिव्हरी सेंटर अर्थात एनडीसी नवीन विभाग निर्माण करण्यात आला आहे. त्याद्वारे पार्सल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यामुळे उपडाकघरातील पोस्टमनचा पार्सल वाटपाचा भार हलका होणार आहे.

शहरातील 13 टपाल कार्यालये आणि तेथील पोस्टमनच्या माध्यमातून विविध सेवा पुरविल्या जातात. देशविदेशातून येणाऱ्या टपालासह पार्सल वाटप प्रत्येक टपाल कार्यालयातून पार्सलचे वाटप होत होते. आता केवळ जीपीओ टपाल कार्यालयातूनच त्यांचे वाटप होईल.

अशी असेल यंत्रणा
नाशिकरोड येथील रेल्वे सेवा आरएमएस विभागात येणारे विविध प्रकारचे पार्सल जीपीओ कार्यालयातील एनडीसी विभागात येणार असून त्यानंतर पार्सल वितरण केले जाणार आहे. एनडीसी केंद्रात नियुक्त केलेले पोस्टमन शहराच्या वेगवेगळ्या भागात पार्सल वाटपाची जबाबदारी पार पडणार आहेत. त्यासाठी चार पोस्टमन, एक लिपिक आणि एक शिपाई यांची नियुक्ती केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या सेवेतील चारही पोस्टमनला त्यांच्या वाहनांसाठी पेट्रोल खर्चाचे वेगळे मानधन देण्यात येणार आहे. सध्या पार्सल वितरणासाठी चार खासगी वाहनांची मदत घेण्यात येत आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार कर्मचारी व वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, एनडीसी विभाग केवळ महापालिका क्षेत्रासाठी कार्यरत राहणार आहे.

शहरासह उपनगरांमध्ये, अन्य भागात, देशात किंवा विदेशात पार्सल पाठविण्यासाठी टपाल कार्यालयातील बुकिंग सुविधा पूर्वीप्रमाणे कायमच आहे. त्यामुळे नागरिकांना मुख्य तसेच उपडाक कार्यालयात पार्सलचे बुकिंग करता येणार असल्याचे पोस्टाकडून स्पष्ट केले आहे.

संबंधित एनडीसी विभाग सुरु झाल्याने शहरात वितरित होणारे पार्सल एकाच ठिकाणी येत असल्याने सेवा तत्परतेने होत आहे व ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.
– मोहन अहिरराव, प्रवर डाक अधिक्षक, नाशिक विभाग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.