एमपीसी न्यूज : – भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आत्मा म्हणजे आपल्या भागातील बूथ सक्षम करणे. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’, ‘बूथ जितो चुनाव जितो’ हे ब्रीद भाजप कार्यकर्त्यांच्या नसानसांत भिनले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्हा प्रभारी आमदार जयकुमार रावल यांनी नाशिक महानगर जिल्हा भाजप जिल्हा कार्यकारणीमध्ये लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधताना केले.
बैठकीला प्रदेश भाजपच्या सरचिटणीस देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विभाग संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, संघटन सरचिटणीस नगरसेवक प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील सर्व मंडल अध्यक्ष, शहर जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी- सदस्य, महापालिकेतील सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजप गटनेता जगदीश पाटील यांच्यासह बहुतांश नगरसेवक इत्यादी उपस्थित होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते कुशल संघटक माजी आ. धरमचंद चोरडिया यांना श्रद्धांजली वाहून बैठकीला सुरुवात करण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिष्टचिंतन केले. महापालिकेच्या स्थायी समिती ताब्यात घेण्याची शिवसेनेने वल्गना करून त्यांना माघार घेण्याची वेळ आणलेल्या विद्यमान सभापती गणेश गिते यांची नाशिक मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी फेरनिवड करण्याचे राजकीय डावपेच आखल्यामुळे नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन, प्रभारी माजी मंत्री जयकुमार रावल यांचे आभार आणि गिते यांचे नाशिक महानगर भारतीय जनता पक्षातर्फे अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन महानगर सरचिटणीस सुनील केदार यांनी तर आभार महानगर उपाध्यक्ष रामहरी संभेराव यांनी मानले.
बैठकीत सरचिटणीस पवन भगुरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात राबवलेली धोरणे आणि सेवा कामकाजाचा आढावा घेऊन केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला कसे बळ दिले याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आणि तो बैठकीत पारित झाला. तसेच केंद्र सरकारमार्फत नाशिकच्या विकासासाठी मिळत असलेल्या उडान योजना, नियोजित सुरत हैद्राबाद महामार्ग, देशातील पहिली नाशिक- पुणे हाय स्पीड रेल्वे इत्यादी विकास कामासह केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नाशिकला नियो मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक सेवा दिली त्यामुळे नाशिकच्या पायाभूत सुविधांमध्ये आणि विकासात मोठ्या प्रमाणात भर पडणार असल्यामुळे पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा आणि आभाराचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव शहर कार्यकारिणीने एक मताने मंजूर केला.
शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आ. देवयानी फरांदे म्हणाल्या, शहरात 10 मंडल आहेत आणि साधारण एक हजार आजी माजी पदाधिकारी- सक्रिय कार्यकर्ते आहेत. 1100 बूथ आहेत. ही यंत्रणा सक्षम झाल्यास पक्षाचे काम आणि राज्य सरकार बाबतचा असंतोष लोकांपर्यंत पोहचविणे शक्य होईल.
बैठकीत आ. सीमा हिरे यांनी ‘नाशिक महापालिकेतील भाजपाची घोडदौड’ या विषयावर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर आ. राहुल ढिकले यांनी शहराच्या विकासाबाबत विद्यमान राज्य सरकार आणि मागील भाजपा सरकारची दिशा याबाबत आपली भूमिका व्यक्त केली. महापालिकेतील सभागृह नेते सतीशबापू सोनवणे यांनी गेल्या चार वर्षात भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील सत्ता काळात होत असलेली विकास कामे आणि भविष्यातील कामांचा वेध घेतला.
विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी संघटनात्मक बांधणी आणि पक्षमार्फत राबवण्यात येणारे आगामी कार्यक्रम याबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये प्रत्येक बूथवर दर महिन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या ‘मन की बात’ चे सामुहिक प्रसारण, 6 एप्रिल ला भाजपा स्थापना दिना निमित्त प्रत्येक घरासमोर कमळाची रांगोळी, दिव्यांची कमळं, कार्यकर्त्यांच्या घरी गुढी प्रमाणे भाजपच्या ध्वजाचे पूजन तसेच 14 एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कमळाच्या आकारात दिव्यांची आरास करून अभिवादन करणे हे तीन कार्यक्रम आगामी काळात यशस्वी करावेत असे आवाहन रवी अनासपुरे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना केले.
तत्कालीन भाजप प्रणित महाराष्ट्र सरकार भाजप आणि आताचे मविआ महाराष्ट्र सरकार अर्थात देवेंद्र फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे सरकार यांच्या विकास कामांतील तुलना आ. राहुल ढिकले यांनी विशद केली. ते म्हणाले, मविआ सरकार तीन चाकी सायकल रिक्षाच्या वेगाने तर मागील देवेंद्र सरकार ‘फेरारी’च्या वेगाने कार्यरत असल्याचे आ. राहुल ढिकले यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. गेल्या दीड वर्षातील अनुभवांवरून राज्यांच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांची ओळख म्हणजे ‘रणांगणातून पळ काढणारे मुख्यमंत्री’ अशीच झालेली आहे.
ठाकरे सरकारने गोरगरीब रुग्णांना अत्यावश्यक असलेला वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणारी ‘मुख्यमंत्री सहाय्यता योजना’ ही योजनाच बंद केली. आमच्याकडे वैद्यकीय कारणासाठी सरकारी मदती साठी दररोज अनेक रुग्ण येतात. मात्र नाईलाजाने रिकाम्या हाताने परत जातात. हीच योजना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून राबवली.
गेल्या वर्षभरात कोरोनाच्या प्रसार विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला असताना, विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका घेत होते आणि जनतेला माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहचतो आहे का? असे विचारत होते. तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही असेही सांगत होते. गेल्या दीड वर्षात सरकारने काय काम केले? हे जर विचारले तर मुख्यमंत्र्यांना ते आज सांगता येणार नाही. त्यामुळे ‘रणांगणातून पळ काढणारे’ हे सरकार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वीज कनेक्शन तोडणार नाही असे आश्वासन देत शेवटच्या दिवशी ते तोडणार असल्याची घोषणा सरकारने केली, यावरून सरकार किती दुटप्पी आहे ते समजेल असे ते म्हणाले.
राज्याच्या अर्थसंकल्पात केंद्राच्या नाशिक- पुणे रेल्वे सारख्या योजनांना आपला वाटा देण्याच्या पलीकडे कोणतेही भरीव काम नाशिककरांसाठी महाविकास आघाडी सरकारने केले नाही. नुकत्याच संपन्न झालेल्या अधिवेशनाची सुरुवात शिवसेनेच्या मंत्र्याच्या राजीनाम्याने झाली तर सांगता शिवसेना प्रणित पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीने झाली.
कपट कारस्थान करून बनवलेल्या सरकारची अधिवेशनात पुरती अब्रू गेली, प्रत्येक दिवशी सरकारला मान खाली घालावी लागली अशी परिस्थिती विरोधी पक्षनेते आणि भाजपचे अभ्यासू माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आणली. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इतकी माहिती कशी येते? हा प्रश्न सरकारला ही पडला होता. मराठा आरक्षण टिकवण्यात आणि त्याबद्दल आपले मत न्यायालयात मांडण्यात हे सरकार कमी पडत आहे.
जनतेच्या आशीर्वादाने बहुमताने आलेले भाजपचे सरकार कपटी राजकारणामुळे अस्तित्वात येऊ शकले नाही याची आठवण आमदार ढिकले यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. देवेंद्रजी फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती केंद्रीय अर्थसंकल्पातून मोठा प्रकल्प देऊन त्यांनी त्याची पूर्तता केली आहे असेही आमदार ढिकले म्हणाले.
यावेळी महापालिकेतील सभागृह नेते सतीश बापू सोनवणे यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या कामाचा, चालू कामांचा आणि आगामी एक वर्षात करावयाच्या कामांचा आढावा घेतला.