Nashik News : शिंदे टोलनाका येथील असुविधा दूर करा; अन्यथा आंदोलन

नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा इशारा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : नाशिक – पुणे हायवेवरील शिंदे टोल नाका येथील असुविधा दूर करा; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नाशिक ट्रान्सपोर्ट संघटनांकडून देण्यात आला आहे.

याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष पी. एम. सैनी यांच्यावतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय आणि टोल व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नाशिक- पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथील असुविधांबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोशीएशनच्या वतीने यापूर्वी देखील निवेदन दिले आहे.

येथील टोल प्रशासनाची मुजोरीची वागणूक यामुळे वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. वाहतूकदार याठिकाणाहून प्रवास करत असताना टोल नाक्यावर फास्ट टॅगमधील तांत्रिक अडचणी येत आहेत.

येथे कार्यरत कर्मचारी व त्यांचे वरिष्ठ गाडीचे परमिट, मालाचे पेपर, लायसन घेतात आणि ड्रायव्हरला दमबाजी करतात. या बद्दल काही विचारले तर टोल व्यवस्थापनाणे आम्हाला सांगितले आहे असे उत्तर दिले जाते.

शिवाय प्रशासनाकडून दादागिरीची भाषा केली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी येथील कर्मचाऱ्यांकडून चालकांना मारहाण केल्याचे प्रकार देखील घडलेले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नाशिक पुणे हायवेवर असलेल्या या शिंदे टोल प्लाझा येथे स्वछतागृहांची देखील गैरसोय आहे. चालकांना थांबण्यासाठी तसेच फ्रेश होण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्याचबरोबर टोल जवळ असलेल्या स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झालेली आहे.

तसेच येथे रुग्णवाहिकेची देखील   सोय नाही. नाशिक ते सिन्नर दरम्यान मोह गावाजवळ रस्त्यात नेहमी खड्डे असतात.  त्या मुळे अपघातही होत असतात.  शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली पायदळी तुडविण्याचे काम या टोल प्रशासनाकडून होत आहे.

याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेली लाईटची व्यवस्था पूर्णपणे बंद असून अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. येथील विविध प्रश्नांबाबत टोल प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर दादागिरीची भाषा केली जात आहे. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील  प्रश्न मार्गी लावण्यात यावे; अन्यथा  आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.