Nashik News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांची आणि महापौरांची उपाययोजनांबाबत आढावा बैठक

एमपीसी न्यूज – नाशिक शहरात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी आज आयुक्तांची भेट घेत उपाययोजनांबाबत आढावा घेतला.

नाशिक शहरात सध्या दर दिवशी अडीच ते तीन हजाराच्या आसपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने मोठ्या प्रमाणात होत असलेल्या सामाजिक संक्रमणाबाबत नाशिक महानगरपालिकेने सध्या सुरु असलेल्या व भविष्यात नव्याने करावयाच्या उपाययोजनांबाबत नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव   यांच्याशी चर्चा केली.

नाशिक शहरात बाजारपेठेमध्ये व रस्त्यावर नागरिक मोठ्या संख्येने विनामास्क फिरत असून सोशल डिस्टन्सिग पळत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. त्याकरिता दंडात्मक कारवाई करण्यात यावी. शहरात लसीकरण व तपासणी केंद्र वाढवून बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणमध्ये राहत असल्याने व रुग्ण हे घरात न रहाता बाहेर फिरत असल्याने त्यांचे इतरांशी संपर्क होऊन रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्या कारणाने पंचवटी मेरी येथील पंजाबराव देशमुख, तपोवन येथील स्वामीनारायण शाळा, समाज कल्याण, ठक्कर डोम इत्यादी ठिकाणी कोविड केयर सेंटर सुरु करण्यात येणार असून काही ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे.

ज्या ठिकाणी सुरु करण्यात आलेले नाही त्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येऊन कोविड सेंटर तातडीने कार्यान्वित करण्यात यावे जेणेकरून बाधित रुग्ण हे शहरात व रस्त्यावर फिरणार नाही याबाबत खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे महापौर यांनी सुचित केले.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील असलेल्या खाजगी व मनपा दवाखान्यांमध्ये बेडची वेळच्या वेळी नागरिकांना कशी उपलब्ध होतील याकरिता वेळोवेळी नागरिकांना माहिती देणे जेणेकरून नागरिक या हॉस्पिटलला संपर्क करून पेशंटला ॲडमिट करू शकतील तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड याबाबतची ही व्यवस्था वेळच्या वेळी नागरिकांकरिता माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात यावी.

मागील वर्षी अशाच पद्धतीने उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी नाशिक महानगरपालिकेला सहकार्य केलेले असल्याने आवश्यकता भासल्यास त्यांच्याशी संपर्क साधून तसेच शहरातील इतर सामाजिक संस्था यांचीही मदत घेण्यात यावी.

संपूर्ण भारतामध्ये नऊ मोठ्या शहरांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत असल्याने त्यातील आठ शहरे ही केवळ महाराष्ट्रातली असून त्यामधील नाशिक शहर हे एक असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे याकरिता ठोस उपाय योजना होणे आवश्यक आहे.

गर्दीचे ठिकाणी वेळच्या वेळी पथकामार्फत तपासणी करण्यात यावी, सिनेमागृह नाट्यगृह इत्यादी ठिकाणी उपस्थितीबाबत नियमांचे पालन केले जात आहे की नाही ही पाहणी करून संबंधितांना नोटिसा द्याव्या. तसेच वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करण्यात यावी. व्यापारी पेठा भाजी बाजार इत्यादी ठिकाणी लावण्यात आलेले अंशतः लॉक डाऊन याबाबत पुन्हा नव्याने फेरविचार होणे आवश्यक असून याबाबत ठोस उपाय योजना या नागरिकांचे जीविताचे हित लक्षात घेता तात्काळ अंबलबजावणी होणे गरजेचे असल्याबाबत इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून याबाबत प्रशासनाच्या वतीने उद्या होणाऱ्या जिल्हा प्रशासन यांचे समोर सदरचे मुद्दे मांडण्यात येऊन याबाबत जिल्हा प्रशासन योग्य ते निर्णय घेतील असे आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी सांगितले.

या आढावा बैठकीमध्ये महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या समवेत स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते, सभागृह नेते सतीश बापू सोनवणे, गटनेते जगदीश भाऊ पाटील यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अष्टीकर, खाडे साहेब, उपायुक्त प्रशासन मनोज घोडे पाटील अधीक्षक अभियंता चव्हाणके, कार्यकारी अभियंता वनमाळी साहेब इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.