Nashik News : नाशिकमध्ये 26, 27, 28 मार्चला साहित्य संमेलन !

साहित्य संमेलनाध्यक्षाची रविवारी होणार घाेषणा

एमपीसीन्यूज : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ( Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal ) आगामी 94  व्या मराठी साहित्य संमेलनाची (94th Marathi Sahitya Sammelan) संभाव्य तारीख निश्चित करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हे संमेलन होणार आहे, त्यासाठी 26, 27 आणि 28 मार्च 2021  अशी तारीख निश्चित करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ प्रतिनिधी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी (दि.24) या संमेलनाच्या अध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे.

नाशिक येथे शनिवारी झालेल्या बैठकीस साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, छत्तीसगढ येथून कपूर वासनिक, मंडळाचे कार्यवाह दिलीप गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, मिलिंद जोशी, दिलीप मानेकर, वर्धा येथून प्रदीप दाते, मुंबई येथून प्राचार्या उषा तांबे, लोकहितवादी मंडळाचे हेमंत टकले, जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, शंकर बोर्‍हाडे, सुभाष पाटील उपस्थित होते.

साहित्य संमेलना निमित्त नाशिक येथे येणार्‍या प्रतिनिधींचे शुल्क, ग्रंथालयांचे स्टॉल्सचे शुल्क याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. हे संमेलन शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस आयोजित केले जाईल. त्याच्या संभाव्य तारखांवरही चर्चा करण्यात आली. त्यानुसार दि. 26, 27 आणि 28 मार्च 2021  या तारखा निश्चित करण्यात आल्या.

तसेच शुक्रवारी (दि. 26) संमेलनाचे उद्घाटन झाल्यावर निमंत्रित कवींचे कवी संमेलन होईल. 27  मार्चला मुलाखत आणि सत्कार केले जातील. यानंतर परिसंवाद आणि कथाकथन आयोजित केले जाईल. तसेच दुसर्‍या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तर 28  मार्च रोजी संवाद, लक्षवेधी कवींचे संमेलन, परिसंवाद करुन समारोप केला जाणार आहे.

संमेलनाध्यक्षपदासाठी भारत सासणे (Bharat Saasne) यांच्या नावाची चर्चा

या संमेलनासाठी साहित्यिक भारत सासणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चिले जात आहे. त्यावर रविवारी दुपारी शिक्कामोर्तब केले जाण्याची दाट शक्यता आहे. तर, स्वागताध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे.

जयंत नारळीकर, भारत सासणे आणि जनार्दन वाघमारे यांच्यापैकी एक नाव अध्यक्षपदासाठी निश्चित हाेऊ शकते. संमेलनस्थळ जाहीर होताच भारत सासणे यांचे अध्यक्षपदासाठीचे नाव अग्रक्रमाने चर्चेत आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.