Nashik News : महापालिकेत शिवसेनाच ‘स्थायी’? कोर्टाचा भाजपला धक्का

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या महासभेने तौलनिक संख्याबळानुसार सदस्य निवडीचा केलेला ठराव रद्द करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याने सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता तसेच जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यामुळे महापालिकेत शिवसेनाच स्थायी होणार का? याकडे लक्ष लागले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढणार असल्याने येत्या काळात होणार्या सभापतिपदाच्या निवडणुकांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या निर्णयानुसार आता भाजपचे स्थायीतील संख्याबळ एकने कमी होणार असुन ते आठ होईल तर दुसरीकडे शिवसेनेचे तौलनिक संख्याबळ अधिक झाल्याने सदस्य संख्या चारवरून पाच होणार आहे. मात्र, अद्याप उच्च न्यायालयाचे अधिकृत निकालपत्र प्राप्त होणे बाकी त्यामुळे नेमका आदेश काय आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यात भाजपचे चार, शिवसेनेचे दोन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एका सदस्याचा समावेश होता. मात्र, भाजपच्या महापालिकेतील दोन जागा घटल्याने त्यांचे संख्याबळ 66 वरून 64 झाले. यामुळे तौलनिक संख्याबळाचा विचार करता शिवसेनेने भाजपच्या संख्याबळावर आक्षेप घेत आमचा एक सदस्य जादा निवडणार असल्याचा दावा करत गटनेते विलास शिंदे यांनी महापौर सतिश कुलकर्णी यांच्याकडे केली होती. परंतु, महासभेत भाजपच्या चार सदस्यांची नियुक्ती कायम ठेवली होती. त्यामुळे शिवसेनेने नगरविकास विभागाकडे धाव घेत तक्रार केली. दुसरीकडे, हे प्रकरण विभागीय आयुक्तांकडे गेले. या दरम्यान नगरविकास विभागाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देत आयुक्तांकडून सदस्य संख्याबळाचा अहवाल मागवला होता.

भाजपच्या सदस्यसंख्येवर होणार परिणाम निवडणुकीत भाजपकडून गणेश गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने गिते सभापती पदास पात्र ठरले. याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला . त्यावर विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर वर्षभर सुनावणी सुरू राहिली. गुरुवारी (दि. 28) न्यायालयाने महासभेचा सदस्य निवडीचा ठराव रद्द केल्याने भाजपच्या सदस्यसंख्येवर परिणाम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.