Nashik News : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या 5 तासात फिल्मी स्टाईलने पकडले चोर

एमपीसी न्यूज – रविवारी सकाळी पंचवटीत घरफोडी करत मोटरसायकल चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या 5 तासात जेरबंद केले.

सहा वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांचे विशेष पोलीस निरीक्षक बर्डीकर, पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड, भाऊसाहेब टिळे, शांताराम घुगे, विशाल आव्हाड, इम्रान पटेल यांना नाशिक-औरंगाबाद महामार्गावर विंचूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना पथकाला दोन संशयित वेगवेगळ्या मोटरसायकलवर येवल्याच्या दिशेने जात असताना दिसले.

असे पकडले चोर
दोन्ही मोटरसायकलच्या मागील व पुढील नंबर प्लेट या वाकवलेल्या असल्याने गस्तीवरील पोलिसांना संशय आला. दोघा संशयितांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे चोरट्यांनी मोटासायकलचा वेग वाढवला. पोलिसांनीही मोटरसायकल स्वारांचा पाठलाग करत भरधाव वेगातील कारमधून रावसाहेब कांबळे, भाऊसाहेब टिळे आणि प्रवीण काकड आदींनी बाहेर वाकून या मोटरसायकल चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्यांनी त्यांच्या हाताला झटका देवून मोटर सायकलचा आणखी वाढवत पोलिसांची दिशाभूल करून आडवळणी रस्त्याने येवला तालु्क्यातील नेवरगाव शिवारात चोरीच्या मोटासायकल बजाज पल्सर व अपाची शेताजवळ टाकून दिल्या.

गावकऱ्यांची घेतली मदत
मागावर असलेल्या पोलिसांच्या धाकाने काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात हे चोर लपून बसले होते. दरम्यान, पावलाच्या ठशावरून शेजारील उसाचे शेतात चोरटे लपले असावे, असा अंदाज विशेष पोलीस पथकाने केला आणि विलंब न करता गावकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेताला घेराव घालण्यात आला. त्यानंतर या विशेष पोलीस पथकाने ऊसाचा शेतात घुसून चोरट्यांना जेरबंद केले.

ग्रामीण विशेष पोलीस पथकाच्या सतर्कतेमूळे पंचवटी परिसरातील घरफोडी मध्ये चोरी गेलेल्या मोटासायकलसह चोरटे ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. पथकाच्या या धडक कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.