Nashik News : आम्ही पक्ष सोडलाच नव्हता; काही काळ तुमच्याकडे सांभाळायला दिला होता

शिवसैनिकांच्या स्वागत समारंभात सुनील बागुल आणि वसंत गीते यांचा सूर

एमपीसीन्यूज : ‘आमची आन, बाण आणि शान ही फक्त शिवसेना होती आणि आहे. आमचा जन्मच मुळात शिवसेनेत झालेला आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून कार्यरत राहायचे होते, पण काही राजकीय परिस्थितीने आम्हाला बाहेर जायला भाग पाडले. आता पुन्हा जरी आपल्या घरच्या पक्षात आलो असलो तरी पक्ष हा आमचाच होता. काही दिवस तुमच्याकडे सांभाळायला दिला होता’, असा सूर सुनील बागुल आणि वसंत गीते यांनी काढला.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपनेते बबन घोलप, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधार बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महिला आघाडीच्या प्रमुख सत्यभामा गाडेकर, माजी महापौर ॲड. यतिन वाघ, सचिन मराठे, विलास शिंदे, भाऊलाल तांबडे, बेलदार आदी उपस्थित होते .

आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सुनील बागुल म्हणाले, काही दिवस राष्ट्रवादी त्यानंतर भाजप असा मी प्रवास केला, पण सगळीकडे एकदम शासकीय कामासारखी शिस्त. त्यामुळे तिथे मन रमत नव्हते. शिवसैनिक आणि थेट ॲक्शन नाही मग तो कोंडमाराच होईल. शिवसेनेत थेट ॲक्शन घेण्याची क्षमता आहे.

जेव्हा भाजप सोडायचं विचार केला तेव्हा सर्वात पहिले विनायक पांडे यांनी सेनेत येण्याची गळ घातली. त्यानंतर रोज शिवसैनिक घरी येऊन मनधरणी करत होते. आता मी सेनेत आलो तरी कोणाच्याही पदाला धक्का लावणार नाही.

तुम्ही सांगाल त्या पदावर आणि सांगाल त्या ठिकाणी काम करु, अशी ग्वाही देत सुनील बागूल यांनी शिवसेनेसोबतच्या आठवणींना आपल्या मिश्किल शब्दात उजाळा दिला.

वसंत गिते सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, 14 वर्षांपूर्वी मनसेला साथ देण्यासाठी शिवसेना सोडली. मनसेतून आमदार झालो. नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा देखील उभारला, पण स्व.बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नव्हती. त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटलो, रडलो देखील.

साहेबांना विनंती केली घरातली भांडण संपली पाहिजे, असे सांगितले. बाळासाहेबांनी देखील मोठ्या मनाने जवळ केले होते, अशा भावनिक शब्दात गीतेंनी आपल्या आठवण्या जागवल्या.

येत्या काळात उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांचे सूक्ष्म नियोजन करुन सर्व ठिकाणी भगवा फडकवू, असा निर्धारही दोघांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.