Nashik News : श्री निवृत्तीनाथ समाधीच्या महापूजेचा मान यावर्षी वारकऱ्यांना; प्रशासकीय समितीचा निर्णय

एमपीसी न्यूज – सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या पौष वारी सोहळ्याच्या महापूजेचा मान वारकऱ्यांना देण्याचा निर्णय संस्थानच्या प्रशासकीय समितीने घेतला आहे.

यावर्षीच्या सर्व महापूजा राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांच्या दिड्यांमधील वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे . अशी माहिती प्रशासकीय समितीचे अ‍ॅड . भाऊसाहेब गंभीर यांनी दिली आहे.

श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचा कार्यभार हाती घेतल्यानंतर प्रशासकीय समितीची सभा सहाय्यक धर्मादाय आयुक्त के. एम. सोनवणे यांच्या उपस्थितीत झाली . यावेळी प्रशासक समितीचे सदस्य अ‍ॅड . भाउसाहेब गंभीरे , त्र्यंबकचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव हे उपस्थित होते.

वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या संस्थानचा कारभार वारकऱ्याभिमुख करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला . कोविड 19 च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करुन तसेच प्रशासनाचे नियम पाळून नित्यपूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दि . 6 ते दि . 9 फेबुवारी या काळात पहाटे 5 होणाऱ्या महापूजा दिंडीमंधील वारकऱ्यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत . त्याखेरीज दि . 07/02/2021 रोजी रात्री होणारी महापूजाही वारकऱ्याच्या हस्ते करण्यात येणार आहे . महापूजेचा मान मिळणाऱ्या वारकऱ्याचा संस्थानतर्फे सन्मान करण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे दि . 08/02/2021 रोजी महापूजा होईल. याबरोबरच दरवर्षीप्रमाणे होणारे कार्यक्रमही अखंडीत होणार आहेत. प्रशासनाने परवानगी दिलेल्या निवडक दिंड्यांमधील वारकऱ्यांची संस्थानच्या परिसरात सोय करण्यात आली आहे. या दिंड्यांमधील वारकऱ्यांचे भजन – कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.

वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी समिती प्रशासनाशी समन्वय साधत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली . श्रीक्षेत्र आळं , श्रीक्षेत्र देहु, श्रीक्षेत्र पंढरपूर, श्रीक्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणाहून येणाऱ्या तसेच नाशिक जिल्ह्यातील दिंड्यांच्याही सोयीसाठी प्रशासकीय समिती प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कोविड 19 चा संसर्ग लक्षात घेता वारकरी बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासकीय समितीने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.