Nashik News : गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकणा-या इसमाचे पुणे कनेक्शन

एमपीसी न्यूज – नाशिक येथे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. साहित्य संमेलनाला आज तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गालबोट लागलं. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संमेलन स्थळी शाई फेकली. शाईफेक करून भ्याड हल्ला करणं निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटू लागली आहे.

गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या रेनेसान्स – दी अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्रा या पुस्तकातील काही भागावर आक्षेप असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडकडून घेण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आल्याचं संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं आहे. गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

सतीश काळे आणि राजेश बुंदला अशी या दोघांची नावं असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी दिली. दरम्यान, यापैकी सतीश काळे हे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. दोघेही आज सकाळी पुण्यातून नाशिकला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

खासदार शरद पवार, संजय राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. तसेच, विचारांची लढाई विचारानेच लढायला हवी, असे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.