Nashik : बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक रेल्वेमार्ग तीन वर्षात पूर्ण होणार – गिरीश महाजन

सहा तासांचा प्रवास होणार अवघ्या अडीच तासांत

‘महारेल’च्या माध्यमातून साडेसात हजार कोटींची गुंतवणूक

एमपीसी न्यूज- मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या पुणे नाशिक या 248 किलोमीटरच्या रेल्वेमार्ग उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. हे काम तीन वर्षात पूर्ण होईल. त्यामुळे सहा तासांचा प्रवास अडीच तासांपर्यंत कमी करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

‘महारेल’ अर्थात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. पुणे नाशिक दरम्यान दळणवळणाची ही नवीन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर दोन्ही शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे, असे ते म्हणाले.

पुणे- नाशिक महामार्ग हा एकच मार्ग सध्या या दोन शहरांना जोडतो. त्यामुळे या महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येतो. त्यासाठी पुणे- नाशिक या रेल्वेमार्गाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. लवकरच या मागणीला मूर्त स्वरूप येणार असून या कामाची सुरुवात महाराष्ट्र रेल्वे मूलभूत सुविधा विकास कंपनी लिमिटेड ‘महारेल’ अर्थात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्तपणे निर्माण झालेल्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी सरकार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक असा हा मार्ग असेल. नियोजित लोहमार्गावरून अवघ्या अडीच तासात पुणे-नाशिक अंतर पार केले जावे असे नियोजन आहे. यामुळे सध्या ट्रॅफिकमुळे लागणारा सहा तासाचा वेळ निम्म्यावर येऊन, प्रवासी वाहनांच्या फेऱ्या कमी होऊन इंधन बचत होईल तसेच प्रदूषणाला आळा बसेल. रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पर्यावरण विषयक फायदे मिळू शकणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

रेल्वे मंत्रालयाने आता 220 किमी प्रति तास धावण्याच्या क्षमतेचे नवीन कोचेस आणूनही रेल्वे ट्रॅकची क्षमता निम्मीच असल्यामुळे ते अपेक्षित वेगाने धावू शकत नाहीत. ही बाब नवीन लोहमार्गात दूर होणार असल्यामुळे गाडीचा वेग दुपटीने वाढणार आहे. या प्रकल्पाबरोबरच इगतपुरी – मनमाड 124 किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचे कामही प्रस्तावित आहे. यामुळे इगतपुरी आणि मनमाड या दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

मनमाड मालेगाव धुळे इंदोर या रेल्वेमार्गाचे कामही लवकरच सुरु होणार असून हा मार्ग धुळे आणि मालेगाव या शहरातून जाणार आहे. हे महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेवर कार्यान्वित होण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत लवकरच आढावा बैठक घेण्यात यावी अशी विनंती महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.