Nasik : आदित्य ठाकरे यांच्या रेंजरोव्हरला बसला रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका

एमपीसी न्यूज- दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचं टायर घोटीजवळ फुटले. त्यामुळे दुसऱ्या गाडीने त्यांना हॉटेलला पोहोचावे लागल्याची माहिती हाती आली आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या गाडीला कोणताही अपघात झाला नसल्याचे सांगत अपघाताची बातमी चुकीची असल्याचे शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई – नाशिक महामार्गावर घोटीजवळील पाडळी गावात रस्त्यांवर खूप मोठे खड्डे पडले आहेत. येथूनच जात असताना आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर कारचा टायर फुटला. मध्यरात्री टायर फुटल्याने सगळ्यांचीच चांगलीच धावपळ झाली. अखेर आदित्य ठाकरे यांना दुसऱ्या कारने हॉटेलवर पोहोचावे लागले.

रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांचा त्रास फक्त सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्याबद्दल अनेकदा आवाज उठवूनही प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आता युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही या खड्ड्यांचा फटका बसला. त्यामुळे आता तरी या मार्गावरील खड्डे बुजवले जातील का हे पाहावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.