National Award : पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; मराठमोळी गायिका सावनी रवींद्रला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पिंपरी-चिंचवडची कन्या आणि मराठमोळी गायिका सावनी रवींद्रला सर्वोत्कृष्ठ महिला पार्श्वगायिका पुरस्कार जाहीर झाला आहे.

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे सोमवारी (दि. 22) घोषित झाली. त्यात सावनीला ‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारत सरकारच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल या संस्थेकडून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर चित्रपट पुरस्कार दिले जातात. संस्थेने 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची नावे सोमवारी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील दोन कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेत्री पल्लवी जोशी यांना सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्री तर गायिका सावनी रवींद्रला सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायिका हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल एमपीसी न्यूजने सावनी सोबत गप्पा मारल्या. त्यात सावनी म्हणाली,

‘मला मिळालेला हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. शब्दात सांगता येणार नाही, एवढा आनंद झाला आहे. देवाची कृपा, आई-वडिलांचे आशीर्वाद, सासर आणि माहेरच्या सर्वांचा सपोर्ट आहे. यामुळे हा पुरस्कार मिळवू शकले. पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर आहेच. पण त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारीची जाणीव आहे. यापुढे माझे प्रत्येक सांगीतिक पाऊल आणखी जास्त जबाबदारीचे असणार आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्या अपेक्षा मला माझ्या गाण्यातून पूर्ण करायच्या आहेत.

राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकने नसतात. या पुरस्कारांची थेट घोषणा केली जाते. अनेक तज्ञांचे पथक यावर अनेक दिवस काम करते. त्यातून ते नावांची घोषणा करतात.

चित्रपटाबद्दल बोलताना सावनी म्हणाली, ‘बार्डो’ हा अत्यंत वेगळ्या प्रकारचा चित्रपट आहे. अजून तो प्रदर्शित झालेला नाही. पुढील काळात लवकरच तो प्रदर्शित होईल. ग्रामीण भागातील ही कथा आहे. एका लहान मुलाची आवड आणि त्यात त्याला साथ देणारे गाव; याभोवती चित्रपटाचे कथानक फिरत आहे. या चित्रपटातून वैज्ञानिक दृष्टीकोन दाखवण्यात आला आहे. अंजली पाटील, मकरंद देशपांडे यांसारखे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत.

या चित्रपटात रोहन रोहन याचं संगीत आहे. चित्रपटाचे निर्मातेही तेच आहेत. चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. अशा चित्रपटासोबत आपले नाव जोडले जाणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ‘रान पेटलं’ हे गाणं चित्रपटात इंटेन्स क्षणी येतं. हे गाणं मी फार वेगळ्या आवाजात गायलं आहे. गाण्याचा विषय आणि त्याला समरूप झालेला आवाज; यामुळे हे गाणं पुरस्कारापर्यंत पोहोचलं असावं असा विश्वास आहे.

मित्र-मैत्रिणी आणि चाह्त्यांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मी खूप भाग्यवान आहे, हे सगळे जवळचे लोक माझ्यासोबत आहेत. माझ्या प्रत्येक गोष्टीला सगळेजण कौतुकाने दाद देत आले आहेत. त्यामुळेच हे मोठं यश मला मिळालं आहे. त्यामुळे मला त्याची किंमत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.