National Fire Service Day : व्हिक्टोरिया बंदरात महाकाय जहाजाला आग अन 700 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू; जाणून घ्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन का पाळला जातो

एमपीसी न्यूज – मुंबई येथील व्हिक्टोरिया बंदराजवळील गोदी (Dock) क्रमांक (National Fire Service Day )एक येथे एका कामगाराच्या चुकीमुळे विशालकाय जहाजाला आग लागली. ही आग एका जहाजापुर्ती मर्यादित न राहता त्यात आजूबाजूची 11 जहाजांना जलसमाधी मिळाली.

बंदरात अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, होमगार्ड, नौदलाचे जवान, नागरी सुरक्षा दलाचे जवान, बंदर अधिकारी व कामगारांसह 231 जणांचा मृत्यू झाला. तर गोदीबाहेर 500 हून अधिक नागरीकांचा मृत्यू झाला. तसेच 2 हजार 408 सामान्य नागरीक जखमी झाले. ही घटना 14 एप्रिल 1944 रोजी घडल्याने या दिवशी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन पाळला जातो. आज 14 एप्रिल निमित्त याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटीश सरकारने ‘एस.एस. फोर्ट स्टिकिन’ हे 1 हजार 395 टन वजनाचे स्फोटकांनी भरलेले मालवाहू जहाज भारतात आणले होते. ज्यामध्ये विस्फोटक बॉम्बचे शेल, टॉर्पेडो, माइन सिग्नल रॉकेट, मॅग्रेशियम फ्लेअर्स दारुगोळा व विस्फोटक रसायने तसेच 238 टन वजनाच्या “अ” श्रेणी दर्जा असलेल्या अत्यंत संवेदनशील स्फोटकांचा समावेश होता. ही रासायनिक स्फोटके जहाजाच्या मधल्या आणि खालच्या मजल्यावर (Deck) साठविलेली होती.

 

स्फोटके लपविण्यासाठी वरच्या मजल्यावर (Deck) कापसाच्या गाठी, फ्लेमेबल ल्युब्रिकेंट ऑइलचे ड्रम, (National Fire Service Day )लाकडी ठोकळे, रंगाने भरलेले पिंप (Paint Drums), माशांचे खत व खाद्य इत्यादी साहित्य भरलेले होते. तसेच मुंबईमध्ये एका बँकेचा हप्ता भरण्यासाठी 31 (लाकडी) पेट्यांमध्ये लपवून सोने भरलेले होते. त्या पेट्या स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. जे की ब्रिटीश युद्धाच्या अर्थव्यवस्थेचा भारतातील विनिमय दरांवर होणारा प्रतिकूल परिणाम रद्द करण्यासाठी वापरले जाणार होते.

‘फोर्ट स्टिकिन’ या जहाजाचा प्रवास 24 फेब्रुवारी 19 44 ला ‘बर्कनहेड (इंग्लंड) येथून सुरू होऊन तो 30 मार्च 1944 रोजी ‘कराची (पाकिस्तान) येथे येऊन संपला. कराची बंदरावर प्रवासी आणि लढाऊ विमाने सोडल्यानंतर कच्च्या कापसाच्या 8 हजार 700 गाठी, ल्युब ऑइलचे ड्रम, लाकूड, भंगार लोखंड, सल्फर, माशांचे खत, तांदूळ आणि राळ (Resin) या जहाजामध्ये चढवण्यात आले. यामध्ये ज्वलनशिल साहित्य खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ‘कॅप्टन नैस्मिथ यांनी जहाजावरील निर्यातकर्त्यांना (Shippers) ज्वलनशील साहित्याबाबत बजावले. निर्यातकर्त्यांचा प्रतिसाद प्रभावी होता, ते आपसात म्हणाले “त्याला (कॅप्टन नैस्मिथला) माहित नव्हते का? की बाहेर युद्ध (जागतिक) सुरू आहे. या ज्वलनशील साहित्यामुळे जहाजात आगीचा अतिरिक्त धोका निर्माण झाला होता.

‘फोर्ट स्टिकिन’ हे जहाज कराचीहून 12 एप्रिलच्या पहाटे ‘मुंबई बंदरावर आले आणि नंतर व्हिक्टोरिया गोदीकडे निघाले. हवाई हल्ला झाल्यास जहाज टार्गेट होऊ नये म्हणून ‘एस.एस. फोर्ट स्टिकिन’ जहाजावरील “लाल ध्वज” (Red Flag) फडकावणे बंद केले होते.

14 एप्रिल रोजी कामगारांच्या 4 टोळ्यांकडून त्या जहाजावरील सर्वसाधारण साहित्य उतरवण्याचे काम सुरू होते. सदर जहाजाच्या खालील मजल्यांमध्ये असलेल्या धोकादायक अथवा स्फोटक साहित्याबद्दल कामगार पूर्णपणे अनभिज्ञ होते. दुपारच्या जेवणाच्या वेळेस एका कामगाराने निष्काळजीपणे धुम्रपान केल्यामुळे कापसाच्या गाठींना आग लागली आणि त्याचवेळी स्वयंस्फूर्तीच्या ज्वलनामुळे फ्लेमेबल ल्युब्रिकेंट ऑइलच्या ड्रममधून गळती झालेल्या ऑइलने पेट घेतला. ऑइलच्या ड्रमजवळ असलेल्या खराब झालेल्या कापसाच्या गाठी पेटल्या. परिणामी, जहाजाच्या खालच्या मजल्यामधून धूर निघू लागला तेव्हा ‘स्टीव्ह डोरेस’ नावाच्या अधिका-याने आगीबाबत ओरडायला सुरुवात केली आणि गोदी परिसरात जहाजावरील धोक्याबाबत लोकांना इशारा देत ते जहाजाच्या वरच्या मजल्यामधून भीतीपोटी जीव वाचविण्यासाठी बाहेर धावू लागले.

या अग्निदुर्घटनेबद्दल अग्निशमन दलाला माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी भयंकर रूप धारण केलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न सुरु केले. सुरुवातीला परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसत होते. परंतु, जहाजावरील अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक साहित्य अधिक असल्याने ती आग नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. अशा मोठ्या अग्नि दुर्घटनेला तोंड देण्यासाठी जहाज बंदरातून बाहेर काढण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला होता. पण बंदरात ‘एस.एस. फोर्ट स्टिकिन’ या जहाजाच्या सभोवती अन्य जहाजे उभी केली असल्याने तो निर्णय निष्कामी ठरला.

त्यानंतर दुसरा पर्याय असा काढण्यात आला की, त्या जहाजाला पुर्णपणे पाण्यात बुडविणेत यावे, परंतु, ‘फोर्ट स्टिकिन’ हे जहाज ज्या पाण्यावर तरंगत होते. बंदर परीसारतील समुद्रातील पाण्याची खोली कमी असल्यामुळे तसेच जहाजास असलेल्या ‘बिल्ज लाईन्स’ (जहाजात साठलेले पाणी बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारी पाईप लाईन) ला नॉन-रिटर्न व्हॉल्व्ह बसविलेले असल्यामुळे सदर जहाज बुडवण्यासाठी पाणी जहाजाच्या आतमध्ये घेणे अशक्य झाले होते, परिणामी जहाजास बुडवण्याचा निर्णय देखील अयशस्वी ठरला.

तिसरा व अंतिम पर्याय असा होता कि, तो म्हणजे प्रत्यक्ष आग विझवण्याचा, जो अग्निशमन दलाच्या जवानांकडून मोठ्या धैर्याने व शर्तीने पूर्ण करण्याचा अतोनात प्रयत्न केला जात होता. परंतु, एका टप्यावर आगीचे प्रमाण कमी होण्याची परिस्थिती दिसत नसल्याने जहाजाच्या कॅप्टनने जहाजावरील सर्वांना जहाज सोडून जाण्याचे आदेश दिले. कारण, स्फोटकांना आग लागली त्यामुळे आगीच्या ज्वाळा खोलीच्या दरवाजामधुन बाहेर येऊ लागल्या. तरीही जीवाची पर्वा न करता अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. जहाजावरील पृष्ठभाग (Deck Plate) जहाजाच्या खालील मजल्यावर लागलेल्या आगीमुळे अतिशय गरम झाल्यामुळे जहाजावर कार्यरत अग्निशमन दलाच्या जवानांचे गमबूट वितळू लागले. तरीही न डगमगता आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीने सुरुच ठेवले.

आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे जहाजावर पहिला स्फोट दुपारी 4:06 वाजता झाला. ज्यामुळे जहाजाची विभागणी दोन भागांमध्ये झाली. अनेक अग्निशमन दलाचे जवान त्यात जखमी झाले. त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचाराकरिता वैद्यकीय केंद्रात हलविण्यात आले, उर्वरित कार्यरत शूर अग्निशमन दलाच्या जवानांनी हार न मानता शेवटच्या श्वासापर्यंत आगीशी झुंज दिली आणि देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. या जीवघेण्या स्फोटाचा प्रभाव इतक्या प्रचंड प्रमाणात होता की, सुमारे 8 कि.मी. अंतरावर असलेल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याच्या नोंदी आहेत.

त्यानंतर, दुपारी 4:45 वाजता दुसरा मोठा विस्फोट झाला. जो इतका शक्तिशाली होता की, त्याने ‘एस.एस. फोर्ट स्टिकिन’ हे जहाज पाण्याच्या पृष्ठभागापासून सुमारे 50 फूट वर उडाले आणि व्हिक्टोरिया गोदीच्या घाटावर येऊन पडले. या दुर्घटनेत अनेक अग्निशमन दलाचे जवान पोलीस, होमगार्ड, नौदलाचे जवान, नागरी सुरक्षा दलाचे जवान, बंदर अधिकारी व कामगारांसह 231 लोकांचा मृत्यू झाला. तसेच, गोदीबाहेर, 500 हून अधिक नागरीकांचा मृत्यु झाला आणि 2 हजार 408 सामान्य नागरीक जखमी झाले. या अग्निदुर्घटनेत घटनास्थळाच्या नजीकची एकूण 13 जहाजे गमवावी लागली, जहाजावरील 50 हजार टन साहित्य नष्ट झाले. तसेच अतिरिक्त 50 हजार टन साहित्याचे गंभीर नुकसान झाले.

दुसऱ्या स्फोटामुळे पेटलेल्या कापसाच्या गाठी गोदी परिसरात उडाल्या, त्यामुळे आग जवळील झोपडपट्टी आणि शेजारच्या परीसरामध्ये पसरली गेली. संपूर्ण व्हिक्टोरिया गोदी मृतांच्या शरीरांनी खचाखच भरली होती त्याच प्रमाणे जवळपासची 11 जहाजे देखील पाण्यात बुडाली होती आणि विशालकाय आगीच्या ज्वालांनी सुमारे 2 चौरस किलोमीटर एवढा परीसर व्यापला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे तीन दिवस लागले आणि गोदीतील कामकाज तथा इतर यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित करण्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागला. या मुंबई बंदरावरील स्फोटाची नोंद ‘सिस्मोग्राफी’ द्वारे 1 हजार 700 किमी दूर असलेल्या शिमला शहरातून करण्यात आली. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता कि 80 कि.मी. दूरपर्यंत ऐकू आला होता.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सन 1955 मध्ये स्थायी अग्निशमन सेवा सल्लागार समिती SFAC (Standing Fire Advisory Committee) ची स्थापना भारताच्या अग्निशमन प्रमुखांच्या शिफारशीवरून केली. या परिषदेच्या पहिल्या बैठकीत, SFAC ने संपूर्ण भारतात वर्षातून एकदा ‘आग प्रतिबंधक सप्ताह’ पाळण्याची शिफारस केली. ही शिफारस त्वरित लागू केली गेली. सन 1965 मध्ये, समितीने आपल्या अकराव्या बैठकीत प्रत्येक वर्षी एक दिवस “राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन (National Fire Service Day) म्हणून पाळला जाणेबाबत निर्णय घेण्यात आला. 14 एप्रिल 1944 रोजी व्हिक्टोरिया गोदीत झालेल्या विस्फोटात प्राणांची आहुती देणाऱ्या शूर अग्निशामक जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी ’14 एप्रिल’ रोजी हा दिवस ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ (National Fire Service Day) म्हणून पाळणेबाबत सूचना देवून, सदरील घोषना भारत सरकारने नोव्हेंबर 1968 मध्ये अधिकृतपणे घोषित करून अंमलबजावणी करणे बाबत आदेश दिले.

आपल्या प्राणांची आहुती देण्या-या त्या सर्व शूर शहीद अग्निशामक जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्हिक्टोरिया गोदी क्रमांक एक येथे घटनास्थळाजवळ ‘अग्रिशमन सेवा शहीद स्मारक’ उभारण्यात आले. आणि 14 एप्रिल 1971 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री व्ही.बी. नाईक, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून संपूर्ण भारत देशात 14 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन” म्हणून पाळला जातो. मुंबई बंदर अग्निदुर्घटनेनंतर आणि आजतागायत लागलेल्या इतर अग्निदुर्घटनेत आगीशी झुंज देताना तथा आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर शहीद अग्निशामक जवानांना या दिवशी संपूर्ण भारत देशात आदरांजली वाहिली जाते.

सन 1944 मध्ये व्हिक्टोरिया गोदी क्रमांक एक (मुंबई) येथे झालेल्या अग्निदुर्घटनेत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद अग्निशामक जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान संपूर्ण भारत देशात ‘राष्ट्रीय आग प्रतिबंधक सप्ताह’ National Fire Service Week पाळला जातो. त्याचप्रमाणे, पुन्हा अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत व त्यात निष्याप बळी जाऊ नयेत. तसेच, देशभरातील सर्व सामान्य नागरिकांना आपल्या निष्काळजीपणामुळे अग्निदुर्घटना घडू नये व स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवितास आणि मालमत्तेस धोका पोहचू नये, याचाबत देशभरातील अग्निशमन विभागामार्फत आवाहन करण्यात येते, तसेच त्यांच्या मध्ये जागरूकता पसरवण्यात येते.

Talegaon Dabhade : डाॅ. ओंकार बाळसराफ यांना डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान

त्याचप्रमाणे, देशभरातील सर्व अग्निशमन दलामार्फत औद्योगिक, वाणिज्यिक, संस्थात्मक, शैक्षणिक, आणि निवासी वसाहतींमध्ये अग्निशमन पथके प्रत्यक्ष जाऊन आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कवायती (Mock Drills) घेऊन नागरिकांना अग्निसुरक्षेसंबंधीत प्रशिक्षण देवून विविध सुरक्षात्मक प्रात्यक्षिक करून जनसामान्यास, विद्यार्थी वर्गास अग्निसुरक्षितते संबंधित अधिक सतर्क व जागरूक करणे कामी प्रयत्न केले जातात. अग्निसुरक्षेसंबंधी प्रशिक्षण सत्र घेऊन आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी, अग्निसुरक्षेसंबंधी करावयाच्या उपाययोजना, आपत्कालीन प्रसंग निर्माण होऊ नयेत, यासाठी घ्यावयाची दक्षता, तसेच आपत्कालीन प्रसंगी काय करावे, काय करू नये अथवा काय टाळावे याबाबतची सविस्तर माहिती दिली जाते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.